कोल्हापूर : गुंड योगेश राणेला अटक | पुढारी

कोल्हापूर : गुंड योगेश राणेला अटक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शहरासह उपनगरामध्ये दहशत माजविणार्‍या शाहूपुरी येथील सराईत गुंड योगेश बाळासाहेब राणे (वय 38, रा. शाहूपुरी) याला लक्ष्मीपुरी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. न्यायालयाने त्याला 30 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

संशयित राणे हा पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी मोका अंतर्गत कारवाईचा बडगाही उगारण्यात आला होता. एक वर्षापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली आहे. एका तरुणाचा खून करण्यासाठी त्याने त्याच्या मैत्रिणीकडे गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसे दिले होते. निपाणीच्या माळावर नेऊन त्याचा कायमचा काटा काढण्याचा बेतही त्याने रचला होता.

पोलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांच्या हालचालीचा अंदाज आल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठीही प्रयत्न केला. जिल्हा सत्र न्यायालय तसेच मुंबई उच्च न्यायालयातही त्याने धाव घेतली होती.

त्याचे दोन्ही अर्ज फेटाळण्यात आल्याने राणे पोलिसांना शरण आला. राणे याच्या मैत्रिणीकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे जप्त केल्याचे पोलिस उपनिरीक्षक इकबाल महात यांनी सांगितले.

Back to top button