नगरची भाग्यश्री फंड ठरली ‘महाराष्ट्र केसरी’ | पुढारी

नगरची भाग्यश्री फंड ठरली ‘महाराष्ट्र केसरी’

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अहमदनगरची भाग्यश्री फंड विरुद्ध कोल्हापूरची अमृता पुजारी यांच्यात महाराष्ट्र केसरी कुस्तीची अंतिम लढत झाली. दोघींमध्ये तुल्यबळ अशी लढत झाली. अटीतटीच्या लढत 2-2 अशा समान गुणांवर सुटताना पंचांनी तांत्रिक सरशीच्या जोरावर अहमदनगरची भाग्यश्री फंडला महाराष्ट्र केसरीची विजेती घोषित केले. कोल्हापूरची अमृता पुजारी हिला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या भाग्यश्रीला मानाची चांदीची गदा व चारचाकी भेट देण्यात आली. शाहू खासबाग मैदानावर या मॅटवरील कुस्त्यांची रंगत पाहायला मिळाली.

राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात तीन दिवसांपासून महिला महाराष्ट्र कुस्तीचा थरार अनुभवायला मिळाला. गुरुवारी सायंकाळनंतर वेगवेगळ्या गटातील अंतिम सामन्यांना सुरुवात झाली. रात्री साडेआठच्या सुमारास महाराष्ट्र केसरीसाठी 76 किलो वजनी गटात नगरची भाग्यश्री फंड व कोल्हापूरची अमृता पुजारी आमने-सामने आल्या. लढतीच्या सुरुवातीपासून कोल्हापूरच्या अमृताने आक्रमक सुरुवात केली. एकेरी पटाचा तिचा पहिलाच प्रयत्न भाग्यश्रीने परतवून लावला. याचवेळी एकलांगी डाव टाकत भाग्यश्रीने 2 गुणांची कमाई केली.

पहिल्या राऊंडच्या अखेरीस अमृतानेही एक गुण मिळवल्याने 2 – 1 असा फरक राहिला. दुसर्‍या राऊंडला भाग्यश्री व अमृता दोघीही थोड्या थकल्याने खडाखडी सुरू होती. भाग्यश्रीच्या बचावात्मक खेळीमुळे अमृताला 1 गुण बहाल केल्याने सामना 2-2 असा गुणांवर आला. अखेरच्या 30 सेकंदांत भाग्यश्रीने अधिक आक्रमकपणे लढत दिली. वेळ संपल्याने पंचांनी तांत्रिक सरशीच्या जोरावर भाग्यश्री फंड हिला विजयी घोषित केले.

महाराष्ट्र केसरी विजेती भाग्यश्री फंड हिला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कोल्हापूरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते चांदीची गदा व चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आयोजक अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद, महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील, पैलवान रवींद्र पाटील, योगेश दोडके यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील तज्ज्ञ, मान्यवर उपस्थित होते. भारतीय कुस्ती महासंघाने महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवर नेमलेल्या अस्थाई समितीच्या परवानगीने व अभिनेत्री दीपाली सय्यद-भोसले चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महिलांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

स्पर्धेतील विविध वजनगटांतील अनुक्रमे निकाल असा

50 किलो : नेहा चौगले (कोल्हापूर), श्रुती येवले (पुणे शहर), समृद्धी घोरपडे (सांगली), साक्षी इंगळे (पुणे). 53 किलो : स्वाती शिंदे (कोल्हापूर), साक्षी चंदनशिवे (सांगली), आदिती शिंदे (पुणे जिल्हा), मेघना सोनुले (कोल्हापूर). 55 किलो : धनश्री फंड (अहमदनगर), स्मिता पाटील (कोल्हापूर), विश्रांती पाटील (कोल्हापूर), अंजली पाटील (सांगली). 57 किलो : सोनाली मंडलिक (अहमदनगर), तनुजा जाधव (चंद्रपूर), तन्वी मगदूम (कोल्हापूर), श्रुती बामनावत (संभाजीनगर). 59 किलो : अंकिता शिंदे (कोल्हापूर), साक्षी पाटील (सातारा), पूजा लोंढे (सांगली), कल्याणी मोहारे (नागपूर). 62 किलो : सृष्टी भोसले (कोल्हापूर), संजना डिसले (सांगली), सोनिया सरक (सोलापूर), सिद्धी कनसे (सातारा). 65 किलो : श्रृंखला रत्नपारखी (संभाजीनगर), पल्लवी पोटफोडे (पुणे जिल्हा), सिद्धी शिंदे (पुणे शहर), अस्मिता पाटील (कोल्हापूर). 68 किलो : श्रावणी शेळके (कोल्हापूर), सई शिंदे (पुणे), प्रीतम दाभाडे (पुणे जिल्हा), शिवानी मेटकर (कोल्हापूर). 72 किलो : वेदांतिका पवार (सातारा), सानिका पवार (अहमदनगर), गायत्री ताटे व वेदिका सासने (दोघी कोल्हापूर). 76 किलो : तृतीय क्रमांक : वैष्णवी कुशाप्पा (कोल्हापूर), प्रतीक्षा बागडी (सांगली).

हिंदकेसरी ठाण्यात : दीपाली भोसले-सय्यद

पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवेळीच महिलांसाठी अशी भव्य स्पर्धा घेण्याचा विचार आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवला होता. तसेच या स्पर्धेसाठी सर्व तयारी करण्यात आली होती. मात्र, कुस्ती संघटनांतील वादांमुळे या स्पर्धेमध्ये अडथळे आल्याचे सांगताना दीपाली भोसले-सय्यद भावुक झाल्या. परंतु, भविष्यात महिला कुस्तीपटूंसाठी हिंदकेसरी कुस्ती स्पर्धा ठाणे येथे घेऊ, असा विश्वास दीपाली भोसले-सय्यद यांनी बोलून दाखवला.

गुणांवरून काही काळ तणाव

अंतिम लढतीवेळी कोल्हापूरची अमृता पुजारी व नगरची भाग्यश्री फंड यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत होता. अखेरच्या काही क्षणांत अमृताही आक्रमक खेळ करत होती. तिला गुण बहाल करावा, अशी मागणी तिचे प्रशिक्षक वारंवार करत होते. सामना संपल्यानंतर तांत्रिक सरशीच्या जोरावर भाग्यश्रीला विजयी घोषित केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Back to top button