शेतकरी, सभासदांचा ऊस करार तारखेनुसार नेणार : सतेज पाटील | पुढारी

शेतकरी, सभासदांचा ऊस करार तारखेनुसार नेणार : सतेज पाटील

कोल्हापूर : उसाची वेळेत तोड झाली नाही, तर शेतकर्‍याला पुढील हंगामातील पीक घेणे अवघड होते. यातून शेतकर्‍याचे अर्थचक्र बिघडते. गेली 28 वर्षे ऊस तोडीसाठी राजाराम कारखान्याच्या सभासदांना गट कार्यालय व सर्कल ऑफिसचे उंबरे झिजवावे लागत आहे. त्यामुळे परिवर्तन आघाडीची सत्ता आल्यानंतर शेतकरी सभासदांच्या उसाला करार तारखेनुसार तोड देण्याबरोबरच नदीकाठच्या पूरबाधित उसालाही प्राधान्याने तोड देण्यात येईल, अशी ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली.

परिवर्तन आघाडीच्या गडमुडशिंगी येथे झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. आ. पाटील म्हणाले, वर्षभर काबाडकष्ट करून पिकवलेला ऊस वेळेत जावा अशी प्रत्येक शेतकर्‍याची अपेक्षा असते. ऊसतोड वेळेत झाली नाही, तर इतर पिके घेण्याबरोबरच पीक कर्जाची वेळेत परतफेड करणेही शेतकर्‍याला कठीण होऊन व्याजाचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होऊ नये म्हणून ऊस करारपत्रकानुसार ऊसतोडीला आम्ही प्राधान्य देऊ. त्याचबरोबर ऊस उत्पादनवाढीचा कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतकर्‍यांना हंगामानिहाय ऊस लागवड, तोडणी, बियाण्यांची निवड, खतांचा योग्य वापर, पाणी नियोजन याची माहिती देण्यात येईल. ऊस उत्पादनवाढ करून शेतकर्‍यांना आर्थिक द़ृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कारखान्याचे माजी संचालक सर्जेराव पाटील म्हणाले, या कारखान्यात संचालकांना सही करायची आणि केवळ चहा-बिस्किट खाऊन घरी यायचे, एवढेच अधिकार आहेत. महाडिकांच्या मनमानीचा अनुभव घ्यायची दुर्दैवी वेळ आमच्यावर आली. त्यामुळे या निवडणुकीत त्यांना हिसका दाखवणार आहे.

पोपट दांगट म्हणाले, आमदार सतेज पाटील सभासद हितासाठी 24 तास राबत असल्याने त्यांच्यावर बोलण्याच्या नैतिक अधिकार महाडिकांना नाही.

यावेळी कावजी कदम, रविराज पाटील, राजू वळिवडे, प्रा. निवास पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. अशोक पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती प्रदीप झांबरे, रविराज पाटील, राजू वळिवडे, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, केडीसीसी बँकेच्या संचालिका स्मिता गवळी, डॉ. प्रकाश पाटील, बाबासो माळी, मधुकर चव्हाण, बसगोंडा पाटील, विलास मोहिते यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Back to top button