दूरस्थ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा | पुढारी

दूरस्थ अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू; 'या' आहेत महत्त्वाच्या तारखा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बी.ए. आणि बी. कॉम. अभ्यासक्रमांसाठी दूरस्थ अध्ययन प्रणालीद्वारे प्रवेश सुरू झाले आहेत. शैक्षणिक सत्र ऑगस्ट 2024 करिता प्रथम वर्षासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी येत्या 30 जुलैपर्यंत संधी देण्यात आली आहे, अशी माहिती प्रशालेचे संचालक डॉ. वैभव जाधव यांनी दिली आहे.
नियमितपणे महाविद्यालयीन शिक्षण घेणे शक्य नसणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशालेने उच्च शिक्षणाची दालने खुली झालेली आहेत.

नोकरदार, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, दुर्गम भागातील नागरिक, व्यावसायिक आदी क्षेत्रात कार्यरत विद्यार्थी अभ्यासक्रमासाठी अर्ज करू शकतात. दुरस्थ अध्ययनाची पदवी ही नियमित महाविद्यालयाच्या पदवीच्या समकक्ष असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने जाहीर केले आहे. बी.ए आणि बी.कॉम. हे दोन्ही अभ्यासक्रम मराठी आणि इंग्रजीतून उपलब्ध आहे. प्रवेशाच्या अधिक माहितीसाठी जवळच्या महाविद्यालयातील अभ्यास केंद्राला भेट द्यावी.

कोणत्या विषयांमध्ये मिळणार पदवी

मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत, इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र आदी विषयांमध्ये बी.ए.ची पदवी प्राप्त करता येईल. तर बी.कॉम. पदवीत व्यवसाय व्यवस्थापन, बँकिंग अ‍ॅन्ड फायनान्स, कॉस्ट अ‍ॅन्ड वर्क्स अकाउंटिंग, बिझनेस अंत्रप्रिन्युअरशीप, इन्शुरन्स ट्रान्सपोर्ट अ‍ॅन्ड टुरिझम या विषयांमध्ये पदवी प्राप्त करण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळणार आहे.

विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायच्या महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज करण्याची अंतिम मुदत : 30 जुलै
  • महाविद्यालयांत प्रवेश अर्ज जमा करणे : 1 ऑगस्ट
  • संकेतस्थळ : http:/// unipune.ac.in/ SOL/

हेही वाचा

Back to top button