कोल्हापूर : हुल्लडबाजी + हाणामारी + दगडफेक = फुटबॉल | पुढारी

कोल्हापूर : हुल्लडबाजी + हाणामारी + दगडफेक = फुटबॉल

कोल्हापूर, सागर यादव : शतकी परंपरा लाभलेल्या कोल्हापूरच्या फुटबॉलला गेल्या काही वर्षांत हुल्लडबाजीचे ग्रहण लागले आहे. पेठांमधील तालीम-मंडळांतील ईर्ष्या, हुल्लडबाजी व समर्थकांचा धिंगाणा, यामुळे कोल्हापूरची क्रीडा परंपरा बदनाम होत आहे. यामुळे होतकरू खेळाडूंचे नुकसान होत आहे. कोल्हापुरात फुटबॉल सामना म्हणजे हुल्लडबाजी-हाणामारी-दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार हे जणू समीकरणच निर्माण झाले आहे.

बर्‍याचदा हुल्लडबाजीमुळे कोल्हापुरात फुटबॉलवर बंदी घालण्यात आली आहे. अशावेळी राजकारणी व पोलिस प्रशासनाच्या बैठकांवर बैठका होतात अन् फुटबॉल हंगाम सुरू केला जातो. थोडे दिवस झाले की, पुन्हा हुल्लडबाजी सुरू होते.

आचारसंहिता केवळ कागदोपत्री!

2019-20 च्या फुटबॉल हंगामात झालेल्या हुल्लडबाजी व दगडफेकीत पोलिसांसह अनेक जण जखमी झाले होते. दुचाकी-चारचाकी वाहनांची मोडतोड व सार्वजनिक मालमत्तेचेही प्रचंड नुकसान झाले होते. यामुळे सुमारे दोन महिने केएसएने फुटबॉल हंगामावर बंदी घातली होती. खेळाडूंच्या करिअरचा विचार करून आणि पोलिस प्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केएसएकडून कडक आचारसंहितेसह फुटबॉल हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आचारसंहितेनुसार मैदानावर डॉल्बी सिस्टीम व फटाके लावणे, गुटखा-मावा-दारू व तत्सम व्यसन करून प्रवेश, राष्ट्रपुरुषांचे पुतळे किंवा राजकीय नेत्यांची छायाचित्रे लावणे, या गोष्टींवर बंदी घातली होती.

उद्घाटन व बक्षीस समारंभावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी हे कार्यक्रम कमी वेळेत आटोपते घेणे. मोठे स्टेज, लाईट-साऊंड सिस्टीम, आतषबाजी अशा गोष्टींवरही मर्यादा आणल्या होत्या. हुल्लडबाजीची सर्वस्वी जबाबदारी संयोजकांवर सोपवून प्रत्येक सामन्याचे सीसीटीव्ही फुटेज देणे, प्रत्येक सामन्याला पोलिस बंदोबस्त असणे, प्रत्येक तालीम-मंडळातील 10 जबाबदार प्रतिनिधींना त्या-त्या समर्थकांत बसविणे बंधनकारक करण्यात आले होते. याशिवाय नाहक ईर्ष्या निर्माण होऊ नये, यासाठी बक्षिसांच्या रकमेवरही मर्यादा आणली होती. हाय व्होल्टेज सामने विनाप्रेेक्षक घेण्याचाही निर्णय केएसएकडून घेण्यात आला होता. मात्र, केएसएची ही आचारसंहिता कागदोपत्रीच राहिली आहे.

अनावश्यक गोष्टींवर लाखोंचा खर्च

कोल्हापूरच्या फुटबॉल हंगामासाठी कोट्यवधी रुपयांची उलाढाल दरवर्षी होते. परदेशी खेळाडूंवर लाखो रुपये खर्च केले जातात. बॅनरबाजीवर लाखो रुपये खर्च केले जातात. स्पर्धा जिंकल्यावर मिरवणुका, साऊंड व लेसर लाईट सिस्टीम, रंगीत-संगीत पार्ट्या यावर प्रचंड खर्च केला जातो. मात्र, प्रत्यक्ष फुटबॉल विकासासाठी काहीही होत नसल्याचे वास्तव आहे.

Back to top button