शाही तुकडा, गुलकंद सरबत अन् हैदराबादी बिर्याणी; रोजाच्या उपवासानिमित्त पदार्थांची रेलचेल | पुढारी

शाही तुकडा, गुलकंद सरबत अन् हैदराबादी बिर्याणी; रोजाच्या उपवासानिमित्त पदार्थांची रेलचेल

कोल्हापूर; गौरव डोंगरे :  मुस्लिम धर्मात अत्यंत पवित्र व आध्यात्मिक समजले जाणारे रमजान महिन्यातील रोजे उपवास सुरू आहेत. या महिन्यात व्यायाम, आहाराला मोठे महत्त्व आहे. दिवसभर पाणीही न पिता कडक उपवास केला जातो. दिवसभर अंगातील ताकद टिकविण्यासाठी सहरी आणि इफ्तारवेळी जो आहार घेतला जातो त्यालाही महत्त्व आहे. या महिन्यात विशेष असे मुस्लिम खाद्य संस्कृतीतील पदार्थ मशिदींबाहेरील स्टॉल्सवर उपलब्ध आहेत. शाही तुकडा, हैदराबादी बिर्याणीसह कबाब, सरबतमधील अनेक प्रकार येथे चाखायला मिळत आहेत.

सूर्य उगविण्यापूर्वी खाण्याला सहरी म्हणतात. यानंतर कोणताही पदार्थ सेवन केला जात नाही; तर सूर्यास्तानंतर रोजाचा उपवास सोडण्याला इफ्तार म्हटले जाते. रमजानच्या दिवसांत शारीरिक थकवा जाणवू नये, यासाठी सहरी आणि इफ्तार या दोन्हीवेळी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश केला जातो.

फलाहार

पहाटेच्या वेळेस अधिकाधिक फायबरयुक्त आहार करण्यावर भर दिला जातो. ज्यामध्ये सरफचंद, बीन्स, कडधान्ये, दही, कच्चे चीज, दूध, सरबत सेवन केले जाते. तसेच केळी, कलिंगड, द्राक्षे, अननस आवडीने खाल्ले जातात.

परिपूर्ण आहार

इफ्तारच्या वेळेस खजूर व फळे खाऊन उपवास सोडला जातो. तसेच सूप, शिजवलेले चिकन, कबाब, मासे खाल्ले जातात. खजुरामुळे ताकद मिळते. तसेच सरबत, नारळ पाणी, सॅलेड यामुळे पाण्याची कमतरता पूर्ण होते.

खाद्य संस्कृतीचे दर्शन

चिकन, मटण बिर्याणीसह कबाबमधील रशियन कबाब, इटालियन कबाब, चिकन कटलेट, तिरंगा कबाब, चीज-पालक कबाब, चिकन साटिया कबाब, चटणी कबाब अशा व्हरायटी आहेत. चिकन रोल, चिकन खिमा, ग्रीन चिकन, चिकन पॅटिस, खिमा समोसा यालाही पसंती मिळते आहे.

सरबतचेही विविध प्रकार

दूध, कलिंगड, सब्जा यापासून बनवलेला मोहब्बत का शरबत, चिक्कू, सफरचंद, दूध असणारे फ्रूट सॅलेड, नारळ पाणी, लिंबू सरबत, उसाचा रस इफ्तारच्या वेळी स्टॉलवर उपलब्ध करण्यात आले आहेत. शहरातील विविध मशिदींबाहेर हे स्टॉल्स सजले असून, मुस्लिम धर्मीयांसोबत इतर खवय्यांच्याही पदार्थांवर उड्या पडत आहेत.

‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर विक्री

चिकन, मटण, सरबतसह शाही तुकडासारखे पदार्थ विशेषत: रमजानमध्येच चाखायला मिळतात. स्टॉलवर हे पदार्थ अत्यंत माफक दरात विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. ‘ना नफा, ना तोटा’ तत्त्वावर केवळ पवित्र रमजान महिन्यातील उपवासानिमित्त हे पदार्थ आम्ही देत असतो, असे विक्रेते कलाम शेख यांनी सांगितले.

Back to top button