‘इचलकरंजी अमृत योजना घोसरवाड मधून झाल्यास 13 गावांचे नंदनवन’ | पुढारी

'इचलकरंजी अमृत योजना घोसरवाड मधून झाल्यास 13 गावांचे नंदनवन'

कुरुंदवाड : पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी अमृत सुळकुड पाणी योजना सुळकुड मधून न होता ती घोसरवाड मधून व्हावी अशी सिद्धेश्वर पाणीपुरवठा योजनेने केलेली मागणी ही रास्त आहे. शिरोळ तालुक्यातील दानवाड पर्यंत दूधगंगा नदी नेहमी प्रवाहित राहून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नदी कोरडी पडणार नाही. शेती व पिण्याच्या पाण्याची चांगली सोय होणार आहे. ही योजना सुळकुड मधून न होता घोसरवाड मधूनच व्हावी यासाठी सिद्धेश्वर पाणीपुरवठ्याला आमचा पाठिंबा असल्याची माहिती माजी सरपंच बाबासाहेब पुजारी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

इचलकरंजी अमृत योजना : 13 गावचे नंदनवन होणार 

पत्रकार परिषदेत पुढे बोलताना माजी सरपंच पुजारी म्हणाले खासदार धैर्यशील माने यांच्याकडे सिद्धेश्वर पाणीपुरवठ्याच्या शिष्टमंडळाने भेट घेतली आहे. सुळकुड ते दतवाड पर्यंत नदीचे पन्नास किलोमीटर पर्यंतचे अंतर आहे. कर्नाटक राज्यातून वळसा घेऊन ही नदी आली आहे. चार टी.एम.सी पाण्याचा साठा कर्नाटक राज्यात उचलला जात असल्याने उन्हाळ्यात दूधगंगा नदी कोरडी पडते. सध्या दूधगंगा कोरडी पडली आहे. अशातच इचलकरंजी अमृत योजना सुळकुड मधून झाल्यास शिरोळ तालुक्यातील तेरा गावांच्या पाण्याचा फार मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. हीच अमृत योजना घोसरवाड मधून कार्यान्वित झाली तर जलसाठा वाढवून मिळेल दत्तवाड बंधारा उंच केल्यास जलसाठा नदी तुडुंब भरून राहून अमृत योजनेच्या पाण्याच्या गरजेसाठी नेहमी पाणी नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे आम्हाला ही पाणी उपसा करायला मिळून 13 गावचे नंदनवन होणार आहे. खा. माने यांच्यासमोर हा प्रस्ताव मांडला आहे.

ही योजना घोसरवाड मधून सुरू झाल्यास 13 गावच्या होणाऱ्या कल्याणाच्या संकल्पनेला राजकीय रंग लावून घोसरवाड अमृत योजनेला विरोध करत बेताल वक्तव्य करत आहेत. याला घोसरवाडची जनता कधीच भीक घालणार नाही. यासाठी आम्ही सिद्धेश्वर पाणी पुरवठ्याच्या योग्य मागणीच्या पाठिंशी असल्याचे सांगितले. यावेळी बबन शिंदे,प्रताप पाटील,गुरुपाद स्वामी,आप्पा कमते, राजेंद्र कोकणे, अनिल संकपाळ, धनपाल चौगुले,दत्ता कमते,सिद्राम पुंदे,चंद्रकांत पोवार, सुरेश चौगुले, दिनकर गवंडी, काका डकू,गिरीश निर्मळे आदी शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

योजना घोसरवाड मधून व्हावी

सिद्धेश्वर पाणीपुरवठ्याच्या शिष्टमंडळाने खा. माने यांच्याकडे ही योजना सुळकुड मधून न होता ती घोसरवाड मधून व्हावी अशी मागणी केली आहे. खा. माने यांनी सुळकुड योजनेची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 167 कोटी रुपये पालिकेच्या खात्यावर जमा झाले आहेत.आपला प्रस्ताव हा दूधगंगा नदीवरील सर्वच गावांना तारणारा आहे.याबाबत 13 गावच्या लोकांना विश्वासात घेऊन याबाबत विचार करू असे आश्वासन दिल्याचे माजी सरपंच पुजारी यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button