कोल्हापूर : कार्यालये ओस, शाळा बंद | पुढारी

कोल्हापूर : कार्यालये ओस, शाळा बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटनांच्या बेमुदत संपाचा पहिल्याच दिवशी परिणाम जाणवला. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिकेत शुकशुकाट होता. जिल्ह्यातील 80 हजार कर्मचारी, शिक्षक संपात सहभागी झाले. जिल्ह्यातील सर्व 360 शासकीय कार्यालये अक्षरश: ओस पडली. कर्मचारीच नसल्याने दैनंदिन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच कोलमडून गेली.

जिल्ह्यातील 3 हजारांहून अधिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद राहिली. जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील सुमारे दोन कोटीहून अधिक वसुली ठप्प झाली. कोट्यवधीच्या महसुलालाही ब्रेक लागला. हजारो फाईल्स टेबलवरच पडून राहिल्या.

निधी वितरणालाही ब्रेक लागला. आरोग्यसेवेवर किरकोळ परिणाम झाला असला, तरी उद्यापासून शस्त्रक्रिया लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शहरातील कचरा उठावावरही या संपाचा परिणाम झाला.

जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ अधिकारी

शिपाई, चालकांपासून सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात केवळ अधिकारी आणि कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात असणारी दररोजची वर्दळ आज नव्हती. संपामुळे नागरिकांनीही कार्यालयात येण्याचे टाळल्याचेच चित्र होते. असेच चित्र प्रांताधिकारी, पुनर्वसन, रेशन वितरण, तहसील कार्यालयांत होते. संपामुळे जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, प्रांत, तहसीलदार आणि मंडळ अधिकार्‍यांकडे असणार्‍या सुुमारे हजारभर सुनावण्या पुढे ढकलल्या गेल्या. तलाठ्यांसह तहसील, प्रांत व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणारी शासकीय वसुली, विविध प्रकरणांतील चलनाद्वारे भरून घेण्यात येणारे शुल्क आदी ठप्प झाले.

जिल्हा नियोजनचे निधी वितरण ठप्प

जिल्हा नियोजन समितीमधील सहायक संशोधन अधिकारी, सांख्यिकी सहायक, उपलेखापाल हे संपात शंभर टक्के सहभागी झाले. यामुळे जिल्हा वार्षिक योजना, आमदार स्थानिक विकास कार्यक्रम, डोंगरी विभाग विकास कार्यक्रम व खासदार विकास कार्यक्रमाच्या विकासकामांच्या प्रशासकीय मान्यतांना ब्रेक लागला. विविध कामांसाठी दिल्या जाणार्‍या निधीचे वितरण ठप्प झाले. संप आणखी काही दिवस सुरू राहिला, तर यावर्षीचा निधी खर्च करण्यास अडचणी येणार आहेत.

जिल्हा परिषद पडली ओस

संपात जिल्हा परिषदेचे 7 हजार 125 कर्मचारी संपात सहभागी झाले. यामुळे जिल्ह्याच्या खेडोपाड्यांतून आलेल्या नागरिकांनी दररोज गजबजलेली जिल्हा परिषद आज ओस पडली होती. कंत्राटी कर्मचारी, होमगार्डसह वरिष्ठ अधिकारी कार्यालयात हजर होते. मात्र, दैनंदिन कामकाज फारसे झाले नाही. अशीच अवस्था जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांमध्ये होती. बहुतांशी समिती कार्यालयांच्या आवारात शुकशुकाटच होता. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सेवा सुरू राहिल्या. मात्र, प्रशासकीय कामकाज पूर्णपणे बंद होते.

शहरातील कचरा उठावावर परिणाम

महापालिकेतील तब्बल साडेतीन हजारांवर कर्मचारी सहभागी झाले. यात कचरा उठाव, संकलन करणार्‍या कर्मचार्‍यांसह इतरांचा समावेश होता. झाडू कामगारही रस्त्यावर नसल्याने शहरात स्वच्छता झाली नाही. कोल्हापूर शहरातील कचरा उठाव झाला नाही. परिणामी, नागरिकांच्या घरात आणि रस्त्यावरच कचरा राहिला. तसेच घरफाळ्यासह विविध विभागांची वसुली ठप्प झाली.

सीपीआरमध्ये वैद्यकीय सेवा सुरू; प्रशासकीय काम ठप्प

सीपीआरमध्ये कर्मचारी संपावर असले, तरी व्हाईट आर्मीच्या 40 हून अधिक जवानांनी येथे आज सेवा दिली. अपघात विभागासह ओपीडी, केस पेपर काढणे, रुग्णांची ने-आण करणे आदी कामे व्हाईट आर्मीच्या जवानांनी केली. महालक्ष्मी अन्नछत्रातर्फे अध्यक्ष राजू मेवेकरी यांनी येथे रुग्णांसाठी जेवणाची सेवा उपलब्ध करून दिली होती. आज ओपीडीला गर्दी होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कर्मचारीही एकत्र जमले होते. त्यांनी घोषणाबाजी करत आंदोलनात सहभाग घेतला. घोषणाबाजी करत ते टाऊन हॉल येथे मोर्चासाठी रवाना झाले. सीपीआर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासकीय कामकाज मात्र ठप्प होते.

आरटीओ कार्यालयात शुकशुकाट

नेहमी गजबजलेल्या आरटीओ कार्यालयात शुकशुकाट होता. खटला, विभाग, वाहन नोंदणी विभाग, लेखा अशा विविध विभागांत दिवसभर शांतता होती. लर्निंग लायसेन्स आणि मोटार ड्रायव्हिंग लायसेन्स विभागात मात्र नागरिकांची वर्दळ होती. सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा विभागासही संपाचा सामना करावा लागला. जलसंपदा विभागाने प्रत्येक उपअभियंत्याला मुख्यालयात थांबणे सक्तीचे केले होते. दिवसभर उपअभियंता कार्यालयातून जिल्ह्याच्या ठिकाणी अहवाल पाठविण्यात येत होता. अशीच स्थिती सार्वजनिक बांधकाम विभागात होती.

दस्त नोंदणी ठप्प; कोटीची उलाढाल थांबली

जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी ठप्प झाली. दररोज 450 ते 550 इतक्या विविध प्रकारच्या दस्तांची नोंदणी होती. आज मात्र एकाच कार्यालयात चार दस्तांची नोंद झाली. पहिल्याच दिवशी सुमारे एक कोटीचा महसूल बुडाला.

कोषागार कार्यालयात बिले टेबलवरच

जिल्हा कोषागार कार्यालयात आज बिले टेबलवरच राहिली. अपवाद वगळता एकही बिल पुढे सरकले नाही. मार्चअखेरजवळ आल्याने कामाची घाई सुरू होती. रात्री उशिरापर्यंत काम सुरू होते. आज मात्र कोषागार कार्यालयातील कामकाज ठप्प झाले.

दहावी, बारावी परीक्षा पेपर तपासणी बंद

संपामुळे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या तीन हजारांहून अधिक शाळा बंद राहिल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. दहावी, बारावी परीक्षेचे कामकाज सुरू असले, तरी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकल्याने पेपर तपासणी बंद आहे. दहावी, बारावी परीक्षा सुरू असल्याने सकाळच्या सत्रातील शाळा बंद राहिल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी मिळाली आहे. 10 वी आणि 12 वी बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून कामकाज सुरळीतपणे सुरू आहे. परंतु, बोर्डाच्या पेपर तपासणीवरील बहिष्कार कायम ठेवला आहे. शैक्षणिकसह प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.

पहिली ते नववीच्या परीक्षांवरही परिणाम शक्य

1 ली ते 9 वीपर्यंतच्या वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहेत. काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्याने उजळणी सुरू आहे. मात्र, काही शाळांचा अभ्यासक्रम अद्याप अपूर्णच आहे. त्यामुळे या परीक्षांवरदेखील परिणाम होण्यची शक्यता आहे.

Back to top button