कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात नवे पान! | पुढारी

कोल्हापूरच्या शैक्षणिक इतिहासात नवे पान!

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  115 वर्षांपूर्वी बहुजनांच्या शिक्षणासाठी आपल्या संस्थानात दरवाजे खुले करणार्‍या राजर्षी शाहू छत्रपतींच्या कोल्हापुरातील शैक्षणिक क्षेत्रामध्ये ऐतिहासिक घटनेची नोंद झाली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने छत्रपतींच्या नावानेच असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबर हृदयशस्त्रक्रिया विषयाच्या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाला हिरवा कंदील दाखविला आहे.

या निर्णयामुळे कोल्हापुरात परिपूर्ण वैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करण्याचे दीर्घकाळाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तज्ज्ञांच्या पथकाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 20 विषयांच्या पदव्युत्तर व हृदयरोगासंबंधित चिकित्सा आणि शस्त्रक्रिया या विषयातील सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांसाठी तपासणी पूर्ण केली. तीन टप्प्यांमध्ये झालेल्या या तपासणीच्या तिसर्‍या टप्प्यात फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात 8 विषयांच्या अभ्यासक्रमांची तपासणी केली होती.

यानंतर आयोगाने हृदयशस्त्रक्रिया (कार्डिओ व्हॅॅस्क्यूलर थोरॅसिक सर्जरी) या सुपर स्पेशालिटी अभ्यासक्रमाबरोबरच न्याय वैद्यकशास्त्र (फोरॅन्सिक मेडिसिन), अस्थिव्यंगोपचार शास्त्र (ऑर्थोपेडिक्स), क्ष-किरणशास्त्र (रेडिओलॉजी) या तीन पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या मंजुरीला हिरवा कंदील दाखविणारे पत्र वैद्यकीय महाविद्यालयाला पाठविले आहे. त्याचे उर्वरित सोपस्कार पूर्ण होताच चालू शैक्षणिक वर्षापासून हे अभ्यासक्रम सुरू होतील.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने तिसर्‍या टप्प्यातील केलेल्या तपासणीमधील डॉक्टरेट इन मेडिसिन (डीएम कार्डिओलॉजी) या सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमाबरोबर समुदाय औषधशास्त्र (कम्युनिटी मेडिसिन), त्वचारोगशास्त्र (डरमॅटोलॉजी) आणि मानसोपचार शास्त्र (सायकेट्री) या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या मंजुरीची पत्रे प्रतीक्षेत आहेत. अल्पावधीत तीही उपलब्ध होतील आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण दोन सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमांबरोबर 20 विषयांचे पदव्युत्तर अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हृदयशस्त्रक्रिया विभागात सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रमासाठी आयोगाने मंजुरी दिल्याने अवघ्या कोल्हापूरकरांचे स्वप्न साकार झाले आहे.

दै.‘पुढारी’ने केला सातत्याने पाठपुरावा

कोल्हापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी दै.‘पुढारी’ने सातत्याने पाठपुरावा केला. अनेक त्रुटींवर बोट ठेवले. राज्यकर्त्यांना कार्यप्रवण केले. यामुळेच 20 विषयांचे पदव्युत्तर व दोन सुपरस्पेशालिटी अभ्यासक्रम सुरू होण्याचा अडथळा दूर झाला आहे. या मंजुरीने प्रत्येक वर्षासाठी एकत्रित सुमारे 95 विद्यार्थी प्रवेश अपेक्षित आहेत. तीन वर्षांच्या या अभ्यासक्रमांचा विचार करता, या शैक्षणिक सुविधेने सुमारे तीनशे अतिरिक्त डॉक्टर्स गोरगरिबांच्या रुग्णसेवेसाठी उपलब्ध होऊ शकतात.

Back to top button