पिसाळलेल्या कुत्र्याचा गांधीनगरमध्ये उच्छाद; २५ जणांना चावा | पुढारी

पिसाळलेल्या कुत्र्याचा गांधीनगरमध्ये उच्छाद; २५ जणांना चावा

गांधीनगर; पुढारी वृत्तसेवा :  गेल्या दोन दिवसांपासून मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्याने येथे पुन्हा एकदा धुडगूस घातला आहे. शुक्रवारी दहा तर शनिवारी पंधरा जणांचा कुत्र्यानी चावा घेतला. गांधीनगर शासकीय उपजिल्हा रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत. मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या त्रास गेल्या महिन्यातही झाला होता. ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडे तक्रारी करूनही मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांच्या आजअखेर बंदोबस्त करण्यात आलेला नाही.

गेल्या दीड-दोन महिन्यांपासून वारंवार मोकाट कुत्र्यासह पिसाळलेल्या कुत्र्यांच्या ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. म्हसोबा माळ परिसर, भाजी मंडई, शिरू चौक, जुने पोस्ट ऑफिस परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने शुक्रवारी व शनिवारी अनेकांचा चावा घेऊन धुमाकूळ घातला. संपूर्ण गांधीनगरमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. सध्या दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना कुत्र्यांचा त्रास होऊ नये म्हणून ग्रामपंचायतीने योग्य ती दक्षता घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. दरम्यान, याबाबत सरपंच संदीप पाटोळे यांनी सांगितले की, तातडीने याबाबत उपाययोजना करू.

पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेण्याचे सत्र सुरूच ठेवल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. अखेर काही ग्रामस्थ व सर्पमित्र स्टीफन बिरांजे यांनी कुत्र्याला पकडले. नाईलाजाने कुत्र्यास ठार मारण्यात आले. त्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Back to top button