कोल्हापूर : भाविकांच्या मांदियाळीत मेतकेत बाळूमामांचा भंडारा.! दीडशे पोती भंडाऱ्याची उधळण | पुढारी

कोल्हापूर : भाविकांच्या मांदियाळीत मेतकेत बाळूमामांचा भंडारा.! दीडशे पोती भंडाऱ्याची उधळण

हमीदवाडा; पुढारी वृत्तसेवा : ‘बाळूमामांच्या नावानं चांगभलं…हालसिद्धनाथाच्या नावानं चांगभलं..’ असा अखंड जयघोष तसेच सुमारे दीडशे पोती भंडाऱ्याची उधळण व सोबतीला ढोलांचा धीर गंभीर दणदणाट. अशा वातावरणात मूळक्षेत्र मेतके (ता. कागल) येथील सद्गुरू बाळूमामा यांनीच स्थापन केलेल्या हलसिद्धनाथ मंदिरात श्री हालसिद्धनाथ व बाळूमामा भंडारा उत्सव संपन्न झाला. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा व आंध्र प्रदेश येथून सुमारे लाखभर भाविकांची मांदियाळी फुलली होती.

जसे मामांनी इथे ज्ञानेश्वरी व श्री विठ्ठल प्रतिमेच्या पूजनाने या मंदिराची स्थापना केली आहे त्याचप्रमाणे हा भंडारा देखील मामांनी 1932 मध्ये स्वतः 40 गावांना चालत जाऊन निमंत्रण देऊन सुरू केला असल्याने त्याला विशेष महत्व आहे.यानिमित्ताने विविध पंचवीसभर गावचे वालंग ढोल वादन मंडळांसह उपस्थित होते.सुरुवातीला मंदिरात पालखी पूजन झाले.त्यानंतर देवाचा सभिना (पालखी सोहळा) निघाला. यावेळी अखंड ढोल वादन, देवाच्या अश्वाचे नृत्य यात भाविक दंग झाले होते. मध्यवर्ती चौकात पालखी भेटीचा ह्रद्य सोहळा पार पडला.पुन्हा रात्रभर ‘हेडाम’चा खेळ व अन्य कार्यक्रमांनी जागर झाला. या सर्व सोहळ्यासाठी रात्रभर भाविक येतच होते. बाळूमामा त्यांचे सद्गुरू मुळे महाराज व श्री विठ्ठल रखुमाई यांचा गाभारा आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला होता. सर्व गावभर रस्ते व गल्ल्या भंडाऱ्याने पिवळ्या धमक झाल्या होत्या. स्वागत फलक देखील गावात मोठ्या प्रमाणात लावण्यात आले होते. या सोहळ्याचे नेटके नियोजन उत्सव समिती,तरुण मंडळे, ग्रामस्थ व सद्गुरू बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टने केले होते.

हेही वाचा

Back to top button