कोल्हापूर : मराठा तरुणांना प्रोजेक्ट रिपोर्टशिवाय 2 लाखांचे कर्ज | पुढारी

कोल्हापूर : मराठा तरुणांना प्रोजेक्ट रिपोर्टशिवाय 2 लाखांचे कर्ज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीने सामान्य व्यवसायासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट (प्रकल्प अहवाल) शिवाय दोन लाखांचे कर्ज देण्यात येईल. तसेच त्याच्या तीन वर्षांच्या व्याजाचा परतावाही महामंडळाडून दिला जाईल, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. पाच वर्षांच्या मुदतीसाठी 40 लाखांचे शैक्षणिक कर्जही महामंडळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिंदे-फडणवीस सरकारने महामंडळाच्या माध्यमातून एक लाख मराठा उद्योजक होण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून व्याज परताव्याची 10 लाखांची मर्यादा 15 लाखांपर्यंत आणि 5 वर्षांची मुदत 7 वर्षांपर्यंत वाढवली आहे. महामंडळाने 56 हजार 941 लाभार्थ्यांना 3 हजार 850 कोटींचे कर्ज दिले असून, 360 कोटींचा व्याज परतावाही दिल्याचे ते म्हणाले.

महामंडळाच्या सर्व कार्यालयांत सीसीटीव्ही कॅमेरे बसवून त्याद्वारे मुख्यालयातून कार्यालयांच्या कामकाजावर देखरेख ठेवली जाईल, असे सांगत लाभार्थ्यांनी कोणत्याही दलालाची मदत घेऊ नये. अशी वेळ येणार नाही, यासाठी दर महिन्याला महामंडळाच्या कामाचा आढावा घेतला जाईल, असेही ते म्हणाले.

राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका या योजनेतील काम गांभीर्याने घेत नसल्याचे दिसते. मात्र, त्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले नाही, तर गांभीर्याने दखल घेतली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जही दिले जाईल. मात्र, त्यांनी ‘सारथी’ अथवा अन्य योजनांतून शिक्षणासाठी लाभ घेतला असेल, तर त्यांना या कर्जाचा लाभ दिला जाणार नाही, असे सांगत पाच वर्षांसाठी 40 लाख मर्यादेपर्यंत कर्ज दिले जाईल. त्याचा आदेश लवकरच काढण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, शशिकांत पाटील आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात 644 कोटींची कर्जे

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेत कोल्हापूर जिल्ह्यात 14 हजार 529 लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते. यापैकी 7 हजार 780 लाभार्थ्यांना 644 कोटी 70 लाख रुपयांचे कर्ज महामंडळाने वितरित केले आहे. यापैकी 6 हजार 797 लाभार्थ्यांना 53 कोटी 40 लाख रुपयांचा व्याज परतावा महामंडळाने दिला आहे. गट कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत जिल्ह्यात 59 व्यक्तींनी ऑनलाईन अर्जांपैकी 53 प्रकरणांना मंजुरी मिळाली असून, 17 कोटी 78 लाख 57 हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. 51 लाभार्थ्यांना 1 कोटी 7 लाख 49 हजार रुपयांचा व्याज परतावा जमा करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button