कोल्हापूर : मुदत संपलेल्या साखर कारखान्यांना प्रारुप याद्या सादर करण्याचे आदेश | पुढारी

कोल्हापूर : मुदत संपलेल्या साखर कारखान्यांना प्रारुप याद्या सादर करण्याचे आदेश

राशिवडे, पुढारी वृतसेवा : कोल्हापूर जिल्ह्यातील लांबलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकांसाठी मतदारांच्या प्रारूप याद्या सादर करण्याचे आदेश प्रादेशिक साखर सहसंचालक ए. व्ही. गाडे यांनी संबंधित साखर कारखान्यांना दिले आहेत. जिल्ह्यातील ज्या साखर कारखान्यांच्या २०२१ मधील एक एप्रिल ते ३१ डिसेंबर आणि २०२२ मधील १ जानेवारी ३१ डिसेंबर पर्यंत संचालक मंडळाची मुदत संपल्या त्या सर्व साखर कारखान्यांची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. एक मार्च पासून याबाबत यंत्रणा कार्यरत झाली आहे.

जिल्ह्यातील सह्याद्री- धामोड, इंदिरा -तांबाळे, आजरा- गवसे’ भोगावती- परिते, उदयसिंह गायकवाड -सोनवडे’ सदाशिवराव मंडलिक-  हमीदवाडा व दूधगंगा- वेदगंगा सहकारी साखर कारखाना- बिद्री यांचा समावेश आहे.  या सर्व साखर कारखान्यांना एक फेब्रुवारी २०२३ या अर्हता तारखेवर प्रारूप मतदार याद्या तयार करून पाठवाव्यात असे आदेश काढले आहेत. ‘अ’ वर्ग उत्पादक सभासदांसाठी एक फेब्रुवारी २०२३ ही अंतिम तारीख निश्चित करून ३१ जानेवारी २०२१ रोजी व त्यापूर्वीचे सभासद ग्राह्य धरून समावेश करावा व त्यानुसार प्रारूप यादी तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी. शिवाय ‘ब’ वर्ग संस्था सभासदासाठी ३१ जानेवारी २०२१ ही तारीख निश्चित करून  त्या दिवशीचे किंवा त्यापूर्वीचे  संस्था सभासद  निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button