कोल्हापूर : सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव | पुढारी

कोल्हापूर : सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव

कोल्हापूर, अनिल देशमुख : कोल्हापूर-मुंबई मार्गावर धावणारी सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही गाडी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पुणे विभागाने रेल्वे बोर्डाला सादर केला आहे. त्यानुसार वेळापत्रकातही त्याचा समावेश केला आहे. या रेल्वे बोर्डाची या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे.

मार्च 2020 पासून बंद केलेल्या गाड्या टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू झाल्या. मात्र, कोल्हापूर-मुंबई मार्गावरील सह्याद्री, कोल्हापूर-सोलापूर, कोल्हापूर-मुणगुरू आणि कोल्हापूर-बिदर या गाड्या अद्याप सुरू झालेल्या नाहीत. कोल्हापूर-मुणगुरू ही हैदराबाद मार्गे जाणारी दैनंदिन गाडी आता बेळगाव-मुणगुरू अशी सुरू आहे.

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत सुरू करावी, अशी सातत्याने मागणी आहे. मात्र, अपेक्षित प्रवाशांचे कारण रेल्वेकडून सांगण्यात येत होते. कोल्हापूर-मुंबई मार्गावर रात्री धावणार्‍या महालक्ष्मी एक्स्प्रेसला प्रचंड गर्दी असते. दररोज दीडशेच्या पुढे वेटिंग असते. त्यामुळे मुंबईला जाणार्‍यांसाठी सह्याद्री एक्स्प्रेसची मागणी कायम आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जुलै महिन्यात रेल्वेचे नवे वेळापत्रक प्रसिद्ध होते. या वर्षीच्या नव्या वेळापत्रकात कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेसचा मध्य रेल्वेने समावेश केला आहे. ही गाडी सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला सादर केला आहे.

पाठपुराव्याची गरज

सह्याद्री एक्स्प्रेसह बंद केलेल्या उर्वरित तीन गाड्या सुरू करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील तीनही खासदारांसह सांगली आणि सातारा जिल्ह्यातील खासदारांनी दिल्लीत सामूहिक प्रयत्न केल्यास सह्याद्री एक्स्प्रेसह अन्य गाड्या पूर्ववत सुरू करणे सहज शक्य आहे.

मंगळूर-मिरज कोल्हापूरपर्यंत विस्तारावी

मंगळूर-मिरज या मार्गावर यापूर्वी धावणारी एक्स्प्रेस पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मिरजपर्यंत येणारी ही गाडी पुढे केवळ 48 किलोमीटरवर कोल्हापूरपर्यंत विस्तारित करणे शक्य आहे. यासाठीही पाठपुरावा करण्याची गरज आहे. तसे झाले तर कोल्हापूर-मंगळूर मार्गावर थेट रेल्वेसेवा सुरू होईल. यामुळे दक्षिणेत जाण्यासाठी प्रवाशांची सोय होईल.

Back to top button