‘गोडसाखर’कडून जिल्हा बँकेला 210 कोटींचा आराखडा सादर | पुढारी

‘गोडसाखर’कडून जिल्हा बँकेला 210 कोटींचा आराखडा सादर

गडहिंग्लज, प्रवीण आजगेकर : आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम बंद असून कारखान्याचे विस्तारीकरण करूनच पूर्ण क्षमतेने कारखाना चालू करण्याचे नियोजन नव्या संचालक मंडळाचे असल्याने त्याद़ृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. यानुसार ‘गोडसाखर’चा 210 कोटींचा आराखडा सोमवारी जिल्हा बँकेला सादर करण्यात आला आहे. आता बँकेच्या तांत्रिक अधिकार्‍यांकडून याची पाहणी झाल्यानंतर बँकेकडून हिरवा कंदील मिळताच आगामी काळांमध्ये ‘गोडसाखर’चे कामकाज वेगावणार आहे. ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सर्व काही वेळेत पार पडले तर कारखान्याच्या विस्तारीकरणाचे काम येत्या 15 दिवसांत सुरू होणार असून पुढील गळीत हंगाम वेळेत सुरू करण्याचे नियोजन संचालक मंडळाचे आहे.

हा आराखडा सादर करताना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सहकार्यातूनच करावा लागत असून ‘गोडसाखर’ने यासाठी नियोजन करून हा आराखडा तयार करून घेतला आहे. या आराखड्यानुसार कारखान्याचे विस्तारीकरण, डिस्टिलरीचे विस्तारीकरण तसेच इथेनॉल प्रकल्प या तिन्ही बाबींसाठी 210 कोटींची तरतूद करावी लागणार आहे. मुळातच ‘गोडसाखर’ची मशिनरी ही बर्‍याच कालावधीपूर्वीची असल्याने नुसताच कारखाना सुरू केला तर प्रत्येक वर्षी कारखान्याच्या तोट्यामध्ये वाढच होणार आहे. यामुळे विस्तारीकरण करूनच कारखान्याचे गाळप सुरू करणे आवश्यक असल्याचे मत संचालक मंडळाचे झाले आहे.

यानुसार एक गळीत हंगाम थांबला तरी चालेल; पण कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबरोबरच अन्य उत्पादने घेऊन कारखान्याचे चाक रूळावर आणण्याचे नियोजन नव्या संचालकांचे आहे. यानुसार हा आराखडा तयार करण्यात आला आहे. केडीसीच्या अधिकार्‍यांकडे हा आराखडा सादर केला असून आता यापुढे बँकेकडून याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सकारात्मक निर्णयानंतर ‘गोडसाखर’मागील शुक्लकाष्ठ संपणार असून कारखान्याचे धुराडे पेटण्याच्या द़ृष्टीने वाटचाल होणार आहे. उणे नेटवर्थचे शुक्लकाष्ट संपल्याने राज्य शासनाच्या थकहमीची आवश्यकता भासणार नसल्याने आता आशा पल्लवीत झाल्या आहेत. यामुळे आता सभासदांच्या नजरा केडीसी बँकेच्या निर्णयाकडे लागून राहिल्या आहेत.

Back to top button