गर्भाशय कर्करोगावरील लस राष्ट्रीय लसीकरणात | पुढारी

गर्भाशय कर्करोगावरील लस राष्ट्रीय लसीकरणात

कोल्हापूर; राजेंद्र जोशी :  देशातील तरुणींच्या आरोग्यासाठी एक दिलासादायक वृत्त आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका रोखण्यासाठी केंद्र सरकार गर्भाशयाच्या कर्करोगाला प्रतिबंध करणारी एचपीव्ही (ह्यूमन पॅपीलोमा व्हायरस) लसीचा येत्या जूनपासून राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत समावेश करीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. यामुळे स्त्रियांच्या मृत्यूचे कारण ठरणार्‍या एका मोठ्या आजाराला रोखणे शक्य होणार आहे.

एचपीव्ही लसीचा राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत समावेश करण्यासाठी केंद्राच्या पातळीवर हालचाली सुरू आहेत. येत्या एप्रिलमध्ये केंद्र सरकार या लसीचे 16 कोटी डोस पुरवठा करण्यासंदर्भात एक जागतिक निविदा प्रसिद्ध करण्याच्या तयारीत आहे. याच्या सहभागासाठी भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि जर्मनीस्थित मर्क या बहुराष्ट्रीय कंपनीने सकारात्मकता दाखवली आहे. 2026 पर्यंत हे डोस संबंधितांमार्फत पुरवण्याचा करार अपेक्षित आहे. एचपीव्ही ही लस 9 ते 14 या वयोगटातील मुलींना दिली जाते. त्यांच्या वय आणि वजनानुसार या लसीचे डोस निश्चित केले जातात.

भारतामध्ये जगातील 16 टक्के महिला राहतात आणि त्यातील गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या जगातील एकूण महिलांच्या 25 टक्के महिला भारतात आहेत.

Back to top button