कोल्हापूर : पदवी, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला! | पुढारी

कोल्हापूर : पदवी, पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!

कोल्हापूर; प्रवीण मस्के :  प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने 2 फेब—ुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठासह राज्यातील बहुतांश विद्यापीठांना पदवी, पदव्युतर अभ्यासक्रमांच्या परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. हिवाळी सत्र परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.

राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचे रद्द केलेले शासन निर्णय पुनरुज्जीवित करून सुधारित सेवांंतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करावी, विद्यापीठातील 1410 कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यांसह अन्य प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी 2021 मध्ये 11 दिवसांचे आंदोलन केले होते; परंतु त्यावेळेस राज्य सरकारने आश्वासने देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

कृती समितीने 13 जानेवारीला मुख्यमंत्री व उच्चशिक्षण मंत्री यांना आंदोलनाबाबतची नोटीस दिली होती. मागण्यांबाबतचे निवेदन दिले; परंतु याची काही दखल घेतली नाही.

1 फेब—ुवारीला उच्चशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत कृती समितीच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली; परंतु मागण्यांसंदर्भात ठोस कृती झाली नसल्यामुळे 2 फेब—ुवारीपासून विद्यापीठ, महाविद्यालयीन व बारावी बोर्डाच्या परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

शिवाजी विद्यापीठातील अधिविभागांसह संलग्नित महाविद्यालयांत 2 फेब—वारीपासून पदवी, पदव्युतर व लॉ द्वितीय वर्ष अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू होणार होत्या; परंतु विद्यापीठ, महाविद्यालयीन कर्मचार्‍यांनी आंदोलन सुरू केल्याने विद्यापीठाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन 2, 3 व 4 फेब—ुवारी रोजी होणार्‍या परीक्षा स्थगित केल्या आहेत. अगोदरच विविध कारणांमुळे परीक्षा एक महिना पुढे गेल्या आहेत, त्यातच कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने विद्यापीठासह विद्यार्थ्यांच्या अडचणींत भर पडली आहे. याचा निकालावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. कर्मचारी आंदोलनाची तीव—ता पाहूनच विद्यापीठ पुढील परीक्षेबाबत निर्णय घेणार असल्याचे परीक्षा विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.

40
अधिविभाग

290
महाविद्यालये

590
अभ्यासक्रम परीक्षा

2 लाखांहून अधिक
विद्यार्थी संख्या

बारावी प्रात्यक्षिक परीक्षांवरही परिणाम शक्य?

बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा 2 फेब—ुवारीपासून सुरू झाल्या आहेत. कोल्हापूर विभागातील 960 हून अधिक कनिष्ठ महाविद्यालयांत 70 हजारांहून अधिक विद्यार्थी प्रात्यक्षिक परीक्षा देणार आहेत. 21 फेब—ुवारीपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा सुरू होणार आहेत. मात्र, विद्यापीठाबरोबरच महाविद्यालयीन कर्मचार्‍यांनी संप पुकारल्याने प्रात्यक्षिक परीक्षांवरदेखील परीक्षा होण्याची शक्यता आहे.

Back to top button