राज्यात फेब्रुवारीअखेर शिक्षक भरती होणार : सूरज मांडरे | पुढारी

राज्यात फेब्रुवारीअखेर शिक्षक भरती होणार : सूरज मांडरे

कोल्हापूर; प्रवीण मस्के :  टीईटी परीक्षेत झालेल्या घोटाळ्याचे निराकरण करून त्याचा निकाल जाहीर केला आहे. शिक्षक भरतीसाठी टीएआयटीसाठी आयबीपीएस एजन्सी अंतिम केली आहे. शिक्षणमंत्री व सचिवांच्या आदेशानंतर फेब—ुवारीअखेर शिक्षक भरती सुरू होईल, अशी माहिती राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांडरे यांनी दिली.

कोल्हापुरात आढावा बैठकीसाठी आलेल्या मांडरे यांनी दै.‘पुढारी’ शी बोलताना ही माहिती दिली. लॉकडाऊन व त्यानंतर शाळांमध्ये शिक्षक कमी असतानाही नावीन्यपूर्ण संकल्पना राबवून त्यांनी शिक्षणाचा दर्जा राखण्याबरोबरच पटसंख्या कायम ठेवली. अशा शाळांमध्ये प्रवेशासाठी रांगा लागल्या, असेही ते म्हणाले.

आपण पदभार स्वीकारल्यानंतर राज्यात दौरा करत आहे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षण विभागाने केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीची माहिती घेत आहे. कर्मचार्‍यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मांडरे म्हणाले.
नवीन शैक्षणिक धोरणात देशभरातून आलेल्या दीड लाखांहून सूचनांचा विचार करून त्याचा समावेश केला आहे. 36 वर्षांनंतर नवीन शैक्षणिक धोरण येत असून त्यामध्ये जगभरातील नवीन गोष्टी अंतर्भूत केल्या आहेत. 30 नोव्हेंबरच्या पटसंख्येवर संचमान्यता करण्यात येईल. शिक्षक अतिरिक्त ठरल्यास त्यांचे समायोजन केले जाईल.

शिक्षकांवरील हल्ले निषेधार्ह : शिक्षण आयुक्त

शाळा परिसरात शिक्षकांवरील हल्ले निषेधार्ह आहेत. विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. शाळा व्यवस्थापन समिती व पालक यांची बैठक घेऊन सूचना दिल्या जातील. जे पालक शिक्षकांशी गैरवर्तन करतात त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान न होऊ देता पोलिसांची मदत घेतली जाईल, असेही मांडरे म्हणाले.

Back to top button