कोल्हापूर : एसटीपी प्रकल्प कालबाह्य;शुद्धीकरणावर मर्यादा | पुढारी

कोल्हापूर : एसटीपी प्रकल्प कालबाह्य;शुद्धीकरणावर मर्यादा

इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरातील मलनिस्सारण प्रकल्प कालबाह्य होण्याच्या वाटेवर असल्याने शुद्धीकरणावर मर्यादा येत आहेत. शहरातून दररोज सुमारे 38 एमएलडी मैलामिश्रीत सांडपाणी जमा होते. त्यापैकी केवळ 18 ते 20 एमएलडी सांडपाण्यावरच प्रक्रिया होते. उर्वरित 18 एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी दररोज पंचगंगा नदीत विनाप्रक्रिया मिसळत आहे.

1998 मध्ये शहराची गरज ओळखून 20 एमएलडी क्षमतेचा एसटीपी प्रकल्प उभारण्यात आला. ड्रेनेजद्वारे टाकवडे वेस येथे मैलामिश्रित पाणी एकत्रित करून पंपाद्वारे कचरा डेपोजवळील प्लँटमध्ये सोडून शुद्धीकरण केले जाते. आता हा प्रकल्प 25 वर्षे जुना झाल्याने वारंवार तांत्रिक बिघाड होतो. परिणामी, प्रक्रिया विनाच पाणी काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीत सोडले जाते.

औद्योगिक शहर असल्याने कामानिमित्त परप्रांतीय मजुरांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी, लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे सांडपाणी व मैलामिश्रित पाणीही त्याच वेगाने वाढत आहे. सध्या दिवसाकाठी 38 एमएलडी मैलामिश्रित पाणी प्रकल्पावर जमा होते. यावर प्रक्रिया करूनच पाणी बाहेर सोडणे आवश्यक आहे; मात्र जमा होणारे पाणी आणि प्रकल्पाची क्षमता यात मोठी तफावत आहे. सुमारे 50 टक्के मैलामिश्रित सांडपाण्यावर प्रक्रिया होऊ शकत नाही. पर्यायाने नाईलाजास्तव हे पाणी विनाप्रक्रिया काळ्या ओढ्यात सोडून दिले जाते. ओघाने हा काळा ओढा पंचगंगा नदी पात्रात जाऊन मिसळत असल्याने पंचगंगाच्या पाण्याच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Back to top button