अमल महाडिकांच्या लढ्यास ‘सर्वोच्च’ यश; सतेज पाटील गटाला धक्का | पुढारी

अमल महाडिकांच्या लढ्यास ‘सर्वोच्च’ यश; सतेज पाटील गटाला धक्का

कोल्हापूर : राजाराम कारखान्याच्या 1,899 सभासदांनी त्यांच्या सभासदत्वाचा लढा सुप्रीम कोर्टामध्ये अखेर जिंकला. त्यांच्या सभासदत्वाविषयी झालेले प्रादेशिक सहसंचालक (साखर), तत्कालीन सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य व हायकोर्ट, मुंबई यांनी दिलेले अपात्रतेचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवून सभासदांचे सर्व हक्क अबाधित ठेवून त्यांना न्याय दिला, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया कारखान्याचे संचालक, माजी आमदार अमल महाडिक यांनी दिली.

छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या अपात्र सभासदांना आपली बाजू मांडण्यासाठी प्रादेशिक साखर सहसंचालक कोल्हापूर विभाग यांनी दोन महिन्यांचा अवधी द्यावा. त्यानंतर पुढील तीन महिन्यांत पात्र-अपात्रतेबाबतचा निर्णय घ्यावा, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्या. पी. नरसिंह यांच्या खंडपीठाने बुधवारी दिला.

निकालाचे स्वागत करून अमल महाडिक म्हणाले, देशामध्ये न्यायव्यवस्था सर्वोच्च असून, न्यायदेवतेने राजाराम कारखान्याच्या या सभासदांना तसेच कारखान्याच्या व्यवस्थापनासदेखील पुरेपूर न्याय दिला, याबद्दल आम्ही सर्व सभासदांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे ऋणी आहोत. विरोधकांनी कारखान्याच्या स्थापनेपासून सभासद असणार्‍या आणि कारखान्याच्या नियमाप्रमाणे सभासदत्व धारण केलेल्या 1,899 सभासदांच्या बाबतीत चुकीची कागदपत्रे सादर करून, तत्कालीन पालकमंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचा गैरवापर करून शासकीय यंत्रणा व तत्कालीन सहकारमंत्री यांना हाताशी धरून या सभासदांना अपात्र ठरविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, ‘भगवान के घर देर है, अंधेर नहीं’ याची सर्वोच्च न्यायालयाने प्रचिती देऊन तत्कालीन पालकमंत्र्यांनी दबावतंत्राने घ्यायला लावलेले हे चुकीचे सर्व निर्णय फटकारून लावले. विरोधकांना या बसलेल्या जबरदस्त चपराकीने आता तरी ते शहाणे होतील का, असा टोला महाडिक यांनी लगावला.

राजाराम कारखान्याचा कारभार माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या कुशल नेतृत्वाखाली पारदर्शीपणे सुरू असून, सर्वच सभासदांनी संचालक मंडळावर विश्वास दाखविला आहे. परंतु, विरोधासाठी विरोध आणि केवळ सोयीचे राजकारण, एवढेच ध्येय मनात ठेवून निष्कारण गोरगरीब सभासदांना अपात्र ठरवून त्यांच्या तोंडचा लाभाचा घास काढून घेण्याचा कुटिल डाव अखेर सभासदांच्या न्याय्य मागणीने हाणून पाडला. दंडुकेशाहीच्या जोरावर छोट्या-मोठ्या लढाया जिंकता येतात; पण महायुद्ध जिंकण्यासाठी संयमाची आवश्यकता असते आणि त्यामुळेच भविष्यात आमच्या विजयाचा वारू कोणीही रोखू शकणार नाही. याची जाणीव विरोधकांनी ठेवावी, असेही ते म्हणाले.

सर्व सभासदांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाचा हा विजय असून, सभासदांच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि सभासदांच्या पाठीशी खंबीरपणे राहून तो जिंकूनही दाखविला. सर्व सभासदांनी दाखविलेल्या प्रेमामुळे आणि कारखान्याच्या कामकाजावरील विश्वासामुळेच आम्हास, या सभासदांच्या लढ्यास हे यश प्राप्त झाले आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया अमल महाडिक यांनी व्यक्त केली.

सर्वोच्च न्यायालयात अमल-सतेज आमने-सामने

कोल्हापूरचा महाडिक-पाटील हायव्होल्टेज सामना सर्वोच्च न्यायालयातही पाहावयास मिळाला. दोन्ही गटांचे नेते सुनावणीवेळी कोर्टात हजर होते. एकीकडे सभासदांना वाचविण्यासाठी अमल महाडिक यांचे प्रयत्न सुरू होते; तर दुसरीकडे कुठल्याही परिस्थितीत सभासदत्व रद्द झालेच पाहिजे, यासाठी सतेज पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर सुप्रीम कोर्टाचा निकाल अमल महाडिक यांच्या बाजूने आला आणि सतेज पाटील बाहेर पडले.

Back to top button