कोल्हापूर : नाताळनिमित्त आज चर्चमधून प्रार्थना | पुढारी

कोल्हापूर : नाताळनिमित्त आज चर्चमधून प्रार्थना

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  नाताळनिमित्त रविवारी (दि.25) शहरातील सर्वच चर्चमधून विशेष भक्ती, उपासनेचे आयोजन केले आहे. देशाच्या शांततेसाठी, आरोग्यासाठी यावेळी विशेष प्रार्थना करण्यात येणार आहेत. नाताळच्या स्वागताची जय्यत तयारी झाली आहे. सर्व चर्चवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. सकाळी दहा वाजता सर्व चर्चमध्ये भक्ती, उपासना आयोजित केली आहे.

प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस (25 डिसेंबर) सर्वत्र नाताळ सण म्हणून साजरा केला जातो. डिसेंबर महिना सुरू झाला की, सर्वत्र नाताळच्या कार्यक्रमांना सुरुवात होते. येशू ख्रिस्तांच्या जन्मावर आधारित गाणी, नाटिका कार्यक्रमातून सादर केल्या जातात. कोल्हापूर शहरात आठ ते दहा प्रमुख चर्च आहेत. याशिवाय इतरत्रही प्रार्थनासभा होत असतात. जिल्ह्यात ख्रिस्ती बांधवांची संख्या मोठी आहे. शहरात वायल्डर चर्चसह, विक्रमनगर चर्च, ख्राईस्ट चर्च, ऑल सेंटस चर्च, ब—ह्मपुरी चर्च, होलिक्रॉस चर्च, न्यू लाईफ चर्च आदींसह विविध चर्च आहेत. याठिकाणी रविवारी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. अनाथ मुलांना, रुग्णांना फळे आणि खाऊवाटप, साड्या वाटप आदी उपक्रमही केले जातात.

नाताळच्या पूर्वसंध्येला सर्वत्र झगमगाट आहे. बाजारपेठही नाताळच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. विविध हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्येही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. आठवडाभर नाताळचे कार्यक्रम सुरू राहणार आहेत.

Back to top button