कोल्हापूर : निश्चित ध्येय, कठोर परिश्रम केल्यास यशस्वी करिअर : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर : निश्चित ध्येय, कठोर परिश्रम केल्यास यशस्वी करिअर : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कुठल्याही क्षेत्रात गेला तरी कष्टाला शॉर्टकट नाही. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर कष्ट करावेच लागणार आहे. करिअरचा मार्ग निवडताना ज्या क्षेत्राची आवड आहे, तेच निवडा. कोणत्याही कोर्सला प्रवेश घेतला तरी विद्यार्थ्यांनी तणावात राहू नये. चांगल्या मित्रांचा ग्रुप, चांगल्या सवयी, सतत वाचन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. निश्चित ध्येय ठेवा, कठोर परिश्रम करा, स्वतःशी प्रामाणिक राहा. तरच यशस्वी करिअर होईल, असा मौलिक सल्ला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

दै. पुढारी 'एज्यु दिशा' शैक्षणिक प्रदर्शनाचे डॉ. व्ही. टी. पाटील सभागृहात शनिवारी सकाळी शानदार उद्घाटन झाले. यावेळी ते बोलत होते. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे मार्केटिंग हेड जमीर मुल्ला, चाटे शिक्षण समूह कोल्हापूर विभागाचे संचालक डॉ. भारत खराटे, दै. 'पुढारी'चे कार्यकारी संपादक विजय जाधव आदी प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, दहावी व बारावीनंतर काय करावे हा प्रश्न घेऊन किंवा पुढे करिअरमध्ये काय संधी आहेत याची माहिती मोबाईल, यू-ट्यूबवर मिळते; परंतु एकाच छताखाली सर्व माहिती मिळावी यासाठी 'एज्यु दिशा'सारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत.

शिक्षण हे फक्त पुस्तके वाचणे किंवा इयत्ता पास होण्यासाठी नाही. दहावी, बारावीनंतर व पदवीपुरते नसून समाजातील एक चांगला नागरिक बनवण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. कोणत्याही क्षेत्रातील करिअर निवडताना आपली आवड लक्षात घेतली पाहिजे. पालकांनीसुद्धा पाल्याची आवड कुठे आहे हे बघितले पाहिजे, असे ते म्हणाले.

आयुष्यभर ज्या गोष्टींमध्ये करिअर करायचे आहे ते पदवीचा कोर्स निवडताना बघितले पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, पूर्वी इंजिनिअर, डॉक्टर या दोनच क्षेत्रापुरते करिअर असल्याचे सांगितले जात होते. काही विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा आर्टस्, कॉमर्सला जायचे. या गोष्टी जीवन ठरवू शकत नाहीत, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गायिका लता मंगेशकर, मार्क झुकेरबर्ग यांना काय करायचे ते समजले. त्यासाठी पूर्णवेळ देऊन अथक परिश्रम केल्याने त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये नाव कमावले आहे.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, दहावी-बारावीमध्ये कमी गुण मिळाले की घरातल्यांचे दडपण राहते. त्यातूनच विद्यार्थी चुकीचे निर्णय घेतात. जीवन महत्वाचे असून क्षुल्लक कारणासाठी नकारात्मक विचार डोक्यात घेऊन दडपणाखाली चुकीचा विचार करु नका. त्याचबरोबर आरोग्याकडे विद्यार्थीदशेत लक्ष द्या. आई-वडिलांना विसरू नका. तुम्ही देशाचे भविष्य आहात. ज्या क्षेत्रात काम कराल त्यामुळे अर्थव्यवस्थेला भरारी मिळेल. जबाबदार नागरिक बनून विद्यार्थ्यांनी समाज विकासासाठी योगदान द्यावे.

इंजिनिअर, डॉक्टर किंवा फक्त स्पर्धा परीक्षा देणे, दहावी, बारावीमध्ये टॉपरच आले पाहिजे, 99 टक्के गुण मिळवणे, 18 तास अभ्यास करावा ही यशाची व्याख्या नाही. जी गोष्ट आपल्याला आवडते त्या गोष्टी करिअरचा निवडताना शोधल्या पाहिजेत. अशा प्रकारच्या यशाच्या व्याख्या करण्यापासून बाहेर पडले पाहिजे, असे जिल्हाधिकारी येडगे म्हणाले.

विनायक भोसले म्हणाले, विद्यार्थी, पालकांसमोर आज कोर्स, करिअर निवडणे यासारखे प्रश्न आहेत. करिअरचा विचार करताना विद्यार्थ्यांनी आवडते क्षेत्र निवडून त्यात शंभर टक्के द्यावे. पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणत्याही गोष्टी लादू नये, कारण प्रत्येक मुलामध्ये काहीतर वेगळे गुण असतात. परीक्षेत कमी गुण मिळाल्यावर डळमळून जाऊ नका. शैक्षणिक संस्था तुमच्या गुडविल म्हणून काम करतात. आयुष्यात मोठे होण्यासाठी त्यांचे योगदान महत्वाचे आहे. सकारात्मक विचार, वेळेचे नियोजन, चांगले मित्र त्याचबरोबर सातत्यपूर्ण अभ्यास केल्यावर जीवनात यश मिळते.

प्रा. भारत खराटे म्हणाले, विज्ञान-तंत्रज्ञानाच्या काळात माणूसपण हरवत चालले आहे की काय अशा पद्धतीची भिती निर्माण झाली आहे. अशा कार्यक्रमांमधून केवळ शैक्षणिक संस्थांची माहिती नाही तर संस्कारांचे प्रबोधन करणे ही खरी दै.'पुढारी' एज्यु-दिशाची देणगी आहे. कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेतील पंक्तीनुसार आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. या पंक्ती आपल्याला करिअरमध्ये लढण्याचा मंत्र देतात. नवीन शैक्षणिक धोरण काही गोष्टी येत आहेत. वन नेशन वन एक्झाम येणार आहे. आज गुणवत्ता कुणाची मक्तेदारी राहिलेली नाही हे लक्षात घेतले पाहिजे. जळगाव ते बेळगाव या सगळ्या शैक्षणिक प्रवासामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला संधी आहे. कोणालाही हात दाखवून नशीब घडत नाही, त्यासाठी कष्टच करावे लागतात, असेही ते म्हणाले.

दै.'पुढारी'चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील यांनी आभार मानले. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजची व्याख्याने

सकाळी 11 ते 11.30
यूपीएससी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गौरव व अनुभव कथन.

सकाळी 11.30 ते 1.
शिक्षण झालं… उत्तम नोकरी कशी मिळवाल?
वक्ते ः सुहास राजेभोसले, संचालक, नोकरी संदर्भ, कोल्हापूर.
शिक्षण झाल्यावर नोकरी करिता अनेक पर्याय उपलब्ध असतात. सरकारी नोकरी असेल किंवा खासगी नोकरी असेल, यामध्ये नोकरी मिळवण्याकरिता अनेक वाटा असतात; परंतु आपल्या आवडीची नोकरी कशी मिळवावी, सरकारी नोकरीमध्ये भरती होण्यासाठी कोणत्या परीक्षा आहेत, त्यांची तयारी कशी करावी, या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

सायंकाळी 5 ते 7
जेईई व नीट परीक्षांना सामोरे जाताना करावयाची पूर्वतयारी.
वक्ते ः एम. बी. सावंत, संचालक, सावंत अ‍ॅकॅडमी, कोल्हापूर.
सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेक विद्यार्थ्यांचे इंजिनिअर किंवा डॉक्टर बनण्याचे स्वप्न असते; परंतु या विषयांच्या अभ्यासक्रमांना जेईई, नीटसारख्या प्रवेश परीक्षांना सामोरे जावे लागते. सध्याच्या स्थितीत शिक्षण संस्थांमध्ये उपलब्ध जागांपेक्षा प्रवेशासाठी इच्छुक असणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी पात्र ठरू शकत नाहीत. याकरिता कशा पद्धतीने अभ्यास करावा, त्याची पूर्वतयारी कशी करावी, याबाबत 'दिशा' या व्याख्यानातून मिळणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news