कोल्हापूर : वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक विस्कळीत | पुढारी

कोल्हापूर : वाहनधारकांच्या बेशिस्तीमुळे वाहतूक विस्कळीत

कोल्हापूर, गौरव डोंगरे : सिग्नलला डावी बाजू रिकामी ठेवावी… वाहन चालविताना मोबाईलवर बोलू नये… एकेरी मार्गावरून उलट्या दिशेने जाऊ नये… दुचाकीवरून ट्रिपलसीट जाऊ नये… आदी वाहतुकीच्या नियमांचे वाहनधारकांकडून राजरोस उल्लंघन सुरूच आहे. मागील तीन वर्षांत 15 कोटींचा दंड थकीत आहे. या वसुलीचे आव्हान शहर वाहतूक शाखेसमोर उभे आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतुकीचा पुरता बट्ट्याबोळ झाला आहे.

वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍यांना चाप बसावा, यासाठी काही महिन्यांपूर्वी केंद्र शासनाने दंडाच्या रकमेत दुप्पट ते पाचपट वाढ केली. पूर्वी 200 रुपये दंड असणार्‍या कारवाईत आता दंडाची रक्कम एक हजाराच्या घरात पोहोचली आहे. त्यातच ई-चलान ही राज्यभरासाठी प्रणाली कार्यान्वित झाली. यामध्ये दंडाची रक्कम भरण्यासाठी पैसे नसल्यास ती थकीत ठेवली जाते. संबंधित वाहन क्रमांकावर ही रक्कम अनपेड स्वरूपात दिसत राहते. एखाद्या नियमाचे उलंघन केलेला वाहनधारक सापडला, तर त्याचा वाहन क्रमांक तपासल्यास मागील थकीत दंडाची रक्कमही दिसून येते. ही प्रणाली भारतभर लागू असल्याने अन्य राज्यांत झालेल्या दंडात्मक कारवाईचीही माहिती एका क्लिकवर दिसते.

थकीत रकमेचा डोंगर

2019 पासून सुरू केलेल्या ई-चलान प्रणालीद्वारे आतापर्यंत 3 लाख 43 हजार वाहनांवर कारवाई केली आहे. यापैकी तब्बल 1 लाख 79 जणांनी दंडच न भरल्याने ही रक्कम 15 कोटींच्या घरात पोहोचली आहे. ही सर्व रक्कम सध्या थकीत आहे. थकीत रकमेचा डोंगर दिवसेंदिवस वाढत असून, या वसुलीचे आव्हान शहर वाहतूक शाखेसमोर आहे.

नियमांचे उल्लंघन

शहरातील एकेरी मार्गांवरून राजरोस नियमांचे उल्लंघन सुरू असते. गुजरी, महाद्वार रोड, शाहूपुरी, राजारामपुरी, शिवाजी चौक, आझाद चौक या वर्दळीच्या ठिकाणी तर दिवसा तसेच रात्रीही कोणी नियम पाळताना दिसत नाही. अनेक ठिकाणी नियम दाखविणारे फलकच अडगळीत गेल्याने वाहनचालकांचीही त्रेधा उडते.

…अशी भरा दंडाची रक्कम

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात ई-चलन मशिनद्वारे रक्कम भरता येते. तसेच ज्या व्यक्तीला एसएमएस गेला आहे त्यातील लिंक ओपन करून अनपेड रक्कम भरता येईल. जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये जाऊन ई-चलन डिव्हाईसवर ही रक्कम भरणा करता येते.

Back to top button