कोल्हापूर : गुळाचा गोडवा हरवला! | पुढारी

कोल्हापूर : गुळाचा गोडवा हरवला!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या दोन वर्षांत गूळ उत्पादनासाठी येणारा खर्च आणि मिळणारा दर यामध्ये किमान 200 रुपयांचा फरक पडला आहे. यामुळे गूळ उद्योग अडचणीत सापडला असून गूळ आवकेत घट झाली आहे. आतापर्यंत बाजार समितीत 2 लाख दहा हजार गूळ रव्यांची आवक झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत 30 हजार रव्यांची घट झाली आहे. सध्या जिल्ह्यात 110 गुर्‍हाळे सुरू आहेत. गेल्या दीड महिन्यात गुळाची सुमारे 20 कोटींची उलाढाल झाली आहे.

दरवर्षी सरासरी ऑक्टोबर महिन्यात गुर्‍हाळे सुरू होती आणि त्यानंतर 15 ऑक्टोबरनंतर साखर कारखान्यांची धुराडी पेटतात. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे गुर्‍हाळे सुरू होण्यास विलंब झाला. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात गुर्‍हाळे सुरू झाली. करवीर,पन्हाळा, शाहूवाडी, कागल, भुदरगड, राधानगरी या तालुक्यांत गुर्‍हाळे आहेत. यातील सर्वात जास्त करवीर तालुक्यात गुर्‍हाळे होती; पण दरातील फरकामुळे करवीर तालुक्यातील गुर्‍हाळांची संख्या घटली आहे.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात 28 हजार गूळ रव्यांची आवक झाली. नोव्हेंबर महिन्यात 75 हजार बॉक्स व पाच आणि दहा किलोंच्या 3 लाख 20 हजार रव्यांची आवक झाली आहे. सध्या वातावरण चांगले आहे. यामुळे गूळ उत्पादनाच्या कामात अडथळा नाही. यामुळे दररोज 7 ते 8 हजार बॉक्स व 20 ते 24 हजार रव्यांची आवक होत आहे.

मागील दोन वर्षांच्या तुलनेमध्ये गुळाच्या दरात सरासरी 200 रुपयांनी घसरण झाली आहे. सध्या तिसर्‍या क्रमांकाच्या गुळास 3500 ते 3650 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत आहे. उच्च प्रतीच्या गुळास 4 हजार 100 ते 4 हजार 200 रुपये असा दर मिळत आहे.

दीड महिन्यात 20 कोटींची उलाढाल

कोल्हापुरी गुळास देशातील अनेक बाजारपेठांतून मागणी आहे. त्यामुळे मार्केट यार्डात सौद्यासाठी आलेल्या सर्व गुळाची विक्री होत आहे. रोज सर्वसाधारणपणे 70 ते 80 लाखांची उलाढाल होत आहे. गेल्या दीड महिन्यात सुमारे 20 कोटी रुपयापर्यंत उलाढाल झाली आहे.

कर्नाटकातील गुळामुळे फटका

गूळ उत्पादक शेतकर्‍यांनी केलेल्या आंदोलनामुळे कर्नाटकातील गूळ कोल्हापुरात आणून विक्री करण्याचे थांबले आहे; पण अनेक व्यापारी बेळगाव, कारवारला जाऊन गूळ खरेदीत करत आहेत. कोल्हापूर पद्धतीने कर्नाटकातील गूळ मिळत असल्याने कोल्हापुरात गूळ खरेदीस येणार्‍या व्यापार्‍यांची संख्या कमी होत आहे. याचा फटका कोल्हापुरी गुळाला बसला आहे. परिणामी दर कमी होत आहे.

Back to top button