हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला महाराणी ताराबाई यांचे नाव द्या : महेश पाटील-बेनाडीकर | पुढारी

हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसला महाराणी ताराबाई यांचे नाव द्या : महेश पाटील-बेनाडीकर

पन्हाळा : पुढारी वृत्तसेवा : करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी छत्रपती ताराबाई यांचे नाव कोल्हापूर हजरत निजामुद्दीन सुपरफास्ट एक्स्प्रेसला देण्यात यावे. आणि पराक्रमी मराठा वीरांगणेचा यथोचित गौरव करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसद यांच्यावतीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय क्षत्रिय जनसंसदचे अध्यक्ष महेश पाटील बेनाडीकर यांनी दिली.

करवीर संस्थानच्या संस्थापिका महाराणी छत्रपती ताराबाई यांचा गौरवशाली पराक्रम भारतीय इतिहासात नोंद आहे. एक थोर कर्तृत्ववान महिला राज्यकर्ती म्हणून त्यांच्या कार्याचा उल्लेख इतिहासात आहे. छत्रपती ताराराणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुनबाई व छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड भारताचे प्रेरणा स्रोत आहेत.

त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून औरंगजेबाला अद्दल घडविण्यासाठी महाराणी ताराबाई यांनी सर्व सरदारांना विश्वासात घेऊन एकत्रित केले. माळवा, गुजरात, कर्नाटकचा बराचसा भाग त्यांनी परत स्वराज्याला जोडला. औरंगजेबाला ताराराणी यांनी कडवी झुंज देत मराठा साम्राज्य आबाधित ठेवले. महाराणी ताराबाई यांना पोर्तुगीजांनी“ मराठ्यांची राणी”असे संबोधले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या त्या कन्या होत.

त्यांचा मृत्यू ९ डिसेंबर १७६१ रोजी झाला. कोल्हापूर येथे छत्रपती ताराराणी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसला ताराराणी यांचे नाव देण्याच्या मागणीचे निवेदन कोल्हापूर रेल्वे स्थानकाचे स्टेशन मास्तर यांना देण्यात आले. यावेळी शाहूराजे डफळे, पराग भोजाने, स्वाती पिसाळ, राजेंद्र मोहिते, जनसंसद संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष स्वाती पिसाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अपर्णा पाटील, ऐश्वर्या देसाई, स्मिता खामकर आदी उपस्थित होते.

हेही वाचलंच का ? 

Back to top button