कोल्हापूर : अधिकारी-ठेकेदारांकडून महापालिकेवर दरोडा | पुढारी

कोल्हापूर : अधिकारी-ठेकेदारांकडून महापालिकेवर दरोडा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील रस्ते अत्यंत खराब झाले आहेत. त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार आहे. ठराविक अधिकार्‍यांनी ठेकेदारांना हाताशी धरून संगनमताने महापालिकेवर दरोडा टाकला आहे, असा आरोप काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी शुक्रवारी केला. काही अधिकारी आयुक्तांचीही फसवणूक करत आहेत. प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानेच अधिकारी निर्ढावले आहेत. जनतेच्या कराच्या पैशातून रस्ते होतात. हा पैसा कुणाच्या बापाचा नाही. अधिकारी-ठेकेदारांना फक्त नोटिसा देऊन चालणार नाही, तडकाफडकी निलंबन आणि ब्लॅक लिस्टची कारवाई करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेत शहरातील रस्तेप्रश्नी बैठक झाली. काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, महापालिकेचे काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर अर्जुन माने प्रमुख उपस्थित होते.

कोल्हापुरी पायताण आंदोलन

कोल्हापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाल्याने काँग्रेसच्या वतीने महापालिका चौकात प्रशासनाच्या निषेधासाठी पायताण आंदोलन केले. भल्या मोठ्या कोल्हापुरी पायताणासह खोरे, पाटी, झारी, कुदळ या साधनांसह झालेल्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आंदोलकांनी प्रचंड घोषणांनी महापालिका चौक दणाणून सोडला होता. त्यानंतर आयुक्त कार्यालयात बैठक झाली.

थर्ड पार्टी म्हणजे सोंग

काँग्रेसचे शहराध्यक्ष चव्हाण यांनी, कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था पाणंदीतून जात असल्यासारखी आहे. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन केले आहे. रस्त्याच्या ऑडिटसाठी थर्ड इन्स्पेक्शनमधून 9 कोटी उधळले आहेत. थर्ड पार्टी ऑडिट हे केवळ सोंग असून, स्वतःला वाचविण्यासाठी अधिकार्‍यांनीच केलेले षड्यंत्र आहे. दुर्वास कदम यांनी, अधिकार्‍यांनी आयुक्तांची दिशाभूल करून कोल्हापूरचे वाटोळे केल्याचा आरोप केला. यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले यांनी काही रस्ते ठेकेदारांकडून पुन्हा करून घेतल्याचे सांगितले. त्यावर शारंगधर देशमुख यांनी, ही अभिमानाची बाब नसून, मान खाली घालायला लावणारी गोष्ट असल्याचे सांगितले. पुन्हा पुन्हा रस्ते करून घ्यावे लागतात म्हणजे किती निकृष्ट काम होत आहे? त्याकडे लक्ष द्या, असेही सुनावले.

…अन्यथा महापालिकेला घेराव

महापालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. चप्पललाईनच्या रस्त्यावर काही वर्षांपूर्वी 15 लाख रुपये खर्च केला. महिन्यात त्यावर खड्डे पडले. पुन्हा खड्डे पॅचवर्कसाठी टेंडर काढले. तोपर्यंत पुन्हा पर्यावरणपूरक म्हणून 25 लाखांच्या रस्त्यासाठी टेंडर काढण्यात आले. एकाच रस्त्यासाठी तीनवेळा टेंडरद्वारे लाखो रुपये घातले. तरीही रस्त्यावर खड्डेच खड्डे असे चित्र आहे. शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. प्रशासनाने तत्काळ रस्ते डांबरीकरण केले नाही तर महापालिकेला घेराव घालू, असा इशारा माजी उपमहापौर भूपाल शेटे यांनी दिला.

माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, प्रताप जाधव, उमा बनछोडे, सागर यवलुजे, राहुल माने, धीरज पाटील, वृशाली कदम आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी होते.

अधिकार्‍यांनो, तुम्हाला लाज वाटत नाही का?

आंदोलनात आणि महापालिकेतील बैठकीत शारंगधर देशमुख, अर्जुन माने, सचिन चव्हाण आदी आक्रमक झाले होते. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना सर्वांनी धारेवर धरले. अधिकार्‍यांनो, तुम्हाला एवढी कशाची गुर्मी आहे. नागरिकांच्या करातून महापालिकेचा कारभार चालतो. खराब झालेल्या रस्त्यांना जबाबदार कोण? ठेकेदारांच्या खिशात किती पैसे घालणार? तुम्हाला लाज वाटत नाही काय? अशी विचारणाही केली. महापालिकेत अधिकारी-ठेकेदारांचे टोळके झाले आहे, असा आरोपही केला. तसेच शहरातील रस्त्यांच्या कामात सुधारणा न झाल्यास सरनोबत यांच्या घरासमोर आंदोलनाच इशारा दिला.

पॅचवर्कसाठी हवेत 40 कोटी

महापालिकेचा डांबर प्लांट बंद असल्याने ठेकेदारांकडून पॅचवर्कची कामे करून घेतली जात आहेत. यापूर्वी 89 लाखांची कामे झाली होती. सद्यस्थितीत पॅचवर्कसाठी सुमारे 30 ते 40 कोटींची आवश्यकता आहे. खराब झालेल्या रस्त्यांची कामे पुन्हा ठेकेदारांकडून करून घेतली जात आहेत. यात 20 रस्त्यांचा समावेश असल्याचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी सांगितले. त्यावर शारंगधर देशमुख चांगलेच संतापले. शहरात फक्त 20 रस्ते खराब आहेत का? अशी विचारणा करून काडी लावा त्या तुमच्या सर्व्हेला, असे सांगितले. त्यानंतर सरनोबत यांनी शनिवारी व रविवारी शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून नव्याने अहवाल देऊ, असे स्पष्ट केले.

Back to top button