कल्याणीनगर अपघात प्रकरण : बिल्डरसह पबचालकांवर गुन्हा दाखल

कल्याणीनगर अपघात प्रकरण : बिल्डरसह पबचालकांवर गुन्हा दाखल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कल्याणीनगर परिसरात भरधाव अलिशान कार चालवून दोघांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे बांधकाम व्यावसायिक वडील आणि मद्य विक्री करणार्‍या हॉटेल (पब) चालकांच्या विरुध्द स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नसताना, तसेच तो अल्पवयीन असल्याची माहिती असताना त्यास कार चालविण्यास वडिलांनी परवानगी दिली. तर पबमध्ये मुलाला मद्य विक्री करण्यात आली. पोलिसांच्या चौकशीत हा प्रकार पुढे आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेल कोझी आणि हॉटेल ब्लॅकच्या मालकासह व्यवस्थापकांचा त्यामध्ये समावेश आहे.

बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल, हॉटेल कोझीचे मालक नमन भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक
संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यातील सहायक निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांनी फिर्याद दिली आहे. दाखल गुन्ह्यानुसार, शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कल्याणीनगर भागात भरधाव कारने दुचाकीस्वार अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांना धडक दिली. अनिश आणि अश्विनी रविवारी रात्री कल्याणीनगर भागातील बॉलर पबमध्ये मित्र-मैत्रिणींसोबत आले होते. तेथून घरी निघाले असताना त्यांना कल्याणीनगर भागात भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातात अनिश आणि अश्विनी यांचा जागीच मृत्यू झाला.

अल्पवयीन मुलगा मद्य प्राशन करतो, याची माहिती बांधकाम व्यावसायिक अगरवाल यांना होती. मुलाने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. रविवारी तो मित्रांबरोबर पार्टीसाठी हॉटेल कोझीमध्ये गेला होता. हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर यांनी खातरजमा न करता त्याला मद्य उपलब्ध करून दिले. त्यानंतर हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे आणि व्यवस्थापक जयेश बोनकर यांनी मुलगा आणि त्याच्या मित्रांना मद्य आणि जेवण उपलब्ध करून दिले. मुलाकडे वाहन परवाना नसताना विशाल अगरवाल यांनी त्याला पोर्शे अलिशान कार चालविण्यासाठी दिली. याप्रकरणी संबंधितांविरूद्ध मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार 3, 5, 199 अ, अल्पवयीन न्याय कायद्यानुसार 77, 75, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

बर्गर, कोल्ड्रिंकचीही चौकशी होणार

अल्पवयीन मुलाला पोलिस ठाण्यात आणण्यात आल्यानंतर त्याला पोलिसांनी बर्गर, कोल्ड्रिंक पुरविल्याची चर्चा रंगली असताना यावर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. असे जर काही झाले असेल तर संबंधित अधिकार्‍यावर तत्काळ कारवाई करून त्याचे निलंबन केले जाईल. याबाबत पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून त्याची पडताळणी सुरू असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

रहिवाशी भागातील बार-पबवर अहवाल

कोरेगाव पार्कसारख्या रहिवासी भागात बार, पबसारख्या व्यावसायिक आस्थापनाला परवानगी कशी मिळते हा प्रश्न आहे. या भागातील 30 व्यावसायिक आस्थापनाची परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल देण्यात आला आहे. पुण्यात काहीही बेकायदा चालू देणार नसल्याचे अमितेश कुमार यांनी सांगितले.

फडणवीस यांनी दिले कठोर कारवाईचे आदेश

पुणे शहरातील कल्याणी नगर परिसरात रविवारी पहाटे झालेल्या अपघाताची दखल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना फोन करून या घटनेसंदर्भातील माहिती घेतली आणि तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत. याबरोबरच या अपघातातील आरोपीला जामीन मिळाला असला तरी त्याच्याविरुद्ध अपील दाखल करण्याच्या सूचना पुणे पोलिस आयुक्तांना फडणवीस यांच्याकडून देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपीला कोणती विशेष ट्रिटमेंट दिली असल्यास त्यावेळचे पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासून ते खरे असेल तर संबंधित अधिकार्‍यावर तत्काळ निलंबनाची कारवाई करा, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news