कोल्हापूर : भ्रष्टाचारासाठी डांबर प्लांट बंद | पुढारी

कोल्हापूर : भ्रष्टाचारासाठी डांबर प्लांट बंद

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : लाईन बाजार येथील महापालिकेचा डांबर प्लांट गेली काही वर्षे बंद आहे. परिणामी, खासगी ठेकेदारांकडून शहरात कोट्यवधी रुपयांची पॅचवर्कची कामे करून घेतली जात आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारासाठी आणि टक्केवारीतून ठेकेदारांना पोसण्यासाठीच ठराविक अधिकार्‍यांनी डांबर प्लांट बंद ठेवला आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेता शारंगधर देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर अर्जुन माने व भूपाल शेटे यांनी केला. एक महिन्यात खासगी प्लांट भाड्याने घेऊन महापालिकेच्या वतीने रस्ते व पॅचवर्कची कामे सुरू करावीत, अशी मागणीही त्यांनी केली.

चव्हाण म्हणाले, काही अधिकार्‍यांना महापालिकेचा डांबर प्लांट सुरू करायचा नाही. कारण, त्यांना त्यात मलिदा खायचा आहे. ठेकेदारांना कामे देऊन टक्केवारीतून भ्रष्टाचारासाठीच प्लांट बंद ठेवला आहे. माजी नगरसेवक प्रताप जाधव यांनी डांबर प्लांट भाड्याने घ्यावा, अशी सूचना केली.

देशमुख यांनी, अधिकार्‍यांनी भ्रष्टाचार करण्यासाठी डांबर प्लांट जाणीवपूर्वक बंद ठेवला आहे. टक्केवारी बंद होईल, अशी भीती असल्याने ते प्लांट सुरू करत नाहीत. लवकरात लवकर प्लांट सुरू करावा किंवा भाड्याने दुसरा प्लांट घ्यावा, अशी मागणी केली; अन्यथा महापालिकेचा डांबर प्लांट सुरू करण्यासाठी ‘भीक माँगो’ आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

महापालिकेतील आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीला प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, उमा बनछोडे, वृशाली कदम, शोभा कवाळे, सागर यवलुजे, माधुरी लाड आदी उपस्थित होते.

डॉ. बलकवडे : रस्ते कामास उशीर भोवला

रस्त्यांची कामे वेळेत सुरू न केल्याप्रकरणी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना नोटीस बजावली आहे. तसेच उपशहर अभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी पत्रकारांना दिली. तसेच यापुढे अधिकार्‍यांनी कामात हलगर्जीपणा केल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

उपशहर अभियंता एन. एस. पाटील, उपशहर अभियंता नारायण भोसले, सेवानिवृत्त उपशहर अभियंता बाबुराव दबडे यांना दंड करण्यात आला आहे. पाटील व भोसले यांना प्रत्येकी 1 हजार रुपये आणि दबडे यांना 5 हजार रुपये दंड केला आहे.

दिवाकर कारंडे निलंबित

महापालिकेचे तत्कालीन कर निर्धारक व संग्राहक दिवाकर कारंडे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. घरफाळा घोटाळाप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसांनी त्यांना काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांना निलंबित केले. महापालिकेत घरफाळा घोटाळा गाजत आहे. 3 कोटी 14 लाखांचे आर्थिक नुकसान केल्याप्रकरणी कारंडे यांच्यासह चौघांवर लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Back to top button