कोल्हापूर : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन | पुढारी

कोल्हापूर : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. उर्फ जयकुमार फाजगोंडा पाटील यांचे बुधवारी (दि. ७) सायंकाळी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांनी शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली होती. यासह ते अर्थतज्ज्ञ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रास सुपरिचित होते.

डॉ. जे. एफ. पाटील यांना शनिवारी (दि.३) तब्बेत बिघडल्याने कोल्हापूरच्या राजारामपुरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान अशक्तपणा व पाढऱ्या पेशी कमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते. पण, उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी त्यांचे निधन झाले.

डॉ. पाटील यांचे मूळ गाव सांगली येथील नांद्रे हे आहे. नोकरीच्या निमित्ताने ते कोल्हापुरात आले अन कोल्हापूर ही त्यांची कर्मभूमी बनली. त्यांनी शिवाजी विद्यापीठासह अनेक सामाजिक संस्था तसेच शासनाच्या विविध मंडळावर सदस्य म्हणून काम केले. त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य म्हणूनही काम पाहिले होते.

त्यांच्या पश्चात पत्नी कमल, मुलगा अभिनंदन, मुलगी राजलक्ष्मी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कोल्हापूरच्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्राची मोठी हाणी झालीची भावना सर्व क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

त्यांनी मराठी अर्थशास्त्र परिषद व शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्षपद भूषवले तसेच भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचेही ते उपाध्यक्ष होते. त्यांची इंग्रजी व मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्र, मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाने डॉ. डी. वाय. पाटील जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे निधन झाल्याचे समजताच रूग्णालयात त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक, विद्यार्थी, संशोधक आदींनी गर्दी केली होती.


अधिक वाचा :

Back to top button