सांगली : खानापूर तालुक्यात ८ ग्रामपंचायती बिनविरोध ; ३७ गावांमध्‍ये रंगणार काट्याची टक्कर | पुढारी

सांगली : खानापूर तालुक्यात ८ ग्रामपंचायती बिनविरोध ; ३७ गावांमध्‍ये रंगणार काट्याची टक्कर

विटा : पुढारी वृत्तसेवा : खानापूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक होत असलेल्या ४५ गावांपैकी गार्डी, गोरेवाडी, ढवळेश्वर, घोटी खुर्द, मादळमुठी, धोंडेवाडी, धोंडगेवाडी आणि वासुंबे  गावांची ग्राम पंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे. तर रेवणगाव येथे सरपंचपदासाठी फक्त लढत होत असून उर्वरित सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत.

खानापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सरपंचपदासाठी १९९ तर सदस्यपदासाठी ९७२ असे १ हजार १७१ अर्ज दाखल झाले होते. सरपंचपदासाठी दाखल झालेल्या १९९ अर्जापैकी १९७ अर्ज वैध तर २ अर्ज अवैध ठरले. सदस्यांसाठी ९७२ अर्जांपैकी ९६२ वैध तर १० अर्ज अवैध ठरले. तालुक्यातील वासुंबे, मादळमुठी, धोंडेवाडी, धोंडगेवाडी ही गावे बिनविरोध झाली होती. आज (दि.७) अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी गार्डी, गोरेवाडी, ढवळेश्वर, घोटी खुर्द ही ४ गावे बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच रेवणगाव येथे सरपंचपदासाठी लढत होत आहे.

आज अर्ज माघारीच्या दिवशी नेते मंडळींची पळापळ दिसून आली. अर्ज दाखल करणाऱ्यांपेक्षा उमेदवारांपेक्षा इतर कार्यकर्त्यांची प्रशासकीय इमारतीत मोठी गर्दी दिसून आली. सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने बहुतांश ठिकाणी बिनविरोधचा फार्म्युला फेल गेल्याचे दिसले. त्यामुळे सदस्यपदासाठीसुद्धा सरपंच पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांनी ही सीट माझ्या संग असू दे ‘असा आग्रह नेते मंडळींच्या समोर धरताना दिसत होती. रेवणगाव येथे उर्वरित सर्व सदस्य बिनविरोध झाले आहेत. त्यामुळे आता ४५ पैकी ३७ ग्रामपंचायतीसाठी यावेळी निवडणूक होणार असे निश्चित झाले आहे.

निवडणूक होणारी गावे 

खानापूर तालुक्यातील कार्वे, कुर्ली, बामणी, चिंचणी (मं.), हिंगणगादे, घानवड, वलखड, चिखलहोळ, भाळवणी, पंचलिंगनगर, कळंबी, आळसंद, वाझर, कमळापूर, बलवडी (भा.), जाधवनगर, लेंगरे, भूड, जोंधळखिंडी, सांगोले, वेजेगाव, वाळूज, ऐनवाडी, जखीणवाडी, जाधववाडी, घोटी बुद्रुक, रेवणगाव, भांबर्डे, करंजे, मोही, रामनगर, ताडाचीवाडी, बाणूरगड, बलवडी (खा.), बेणापूर, सुलतानगादे, हिवरे या ३८ ग्रामपंचायतींसाठी १८ डिसेंबर राेजी मतदान होणार आहे.

गार्डी गावची बिनविरोधाची परंपरा कायम

सांगली जिल्ह्यातील विटा शहरा जवळील गार्डी हे गाव. या गावात ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासूनच निवडणुका होत नाहीत. आमदार अनिलराव बाबर यांचे हे गाव. या गावात एकूण ४ प्रभाग आहेत. येथे यावेळी एकूण १२ सदस्य आणि लोकनियुक्त सरपंच पदासाठी असे मिळून १३ जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यावेळी सरपंच पदासाठी ८ तर सदस्य पदासाठी एकूण ४२ जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामुळे या गावात प्रथमच निवडणूक होणार, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, आमदार अनिलराव बाबर, हेमंत बाबर, अजित बाबर, राहुल बाबर, अतुल बाबर आणि गावातील इतर प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतीची बिनविरोधाची परंपरा कायम राखली आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button