कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बुधवारी दत्त जन्मोत्सव सोहळा | पुढारी

कोल्हापूर : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे बुधवारी दत्त जन्मोत्सव सोहळा

नृसिंहवाडी: पुढारी वृत्तसेवा : श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात दत्त जन्मोत्सव सोहळा बुधवारी (दि. ७) सायंकाळी ५ वाजता लाखो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. पहाटे ४ वाजता मंदिरात काकड आरती होईल. सकाळी ८ ते १२ या वेळेत श्रींच्या पादुकांवर भाविकांकडून अभिषेक सेवा होईल. दुपारी १२ वाजता श्रींच्या महापूजेस प्रारंभ होईल. १ वाजता नैवेद्य, आरती होईल. ३ ते ४ या दरम्यान, पवमान पंचसूक्त पठण तसेच पुराण होईल. साडेचार वाजता श्रींच्या उत्सव मूर्तीचे जन्मा काळासाठी मुख्य मंदिरात आगमन होईल. यावेळी मिरज येथील ह. भ. प. रोहित दांडेकर यांचे कीर्तन होईल. सायंकाळी ५ वाजता श्रींचा जन्मोत्सव सोहळा मुख्य मंदिरात होईल. त्यानंतर दत्त नामाच्या गजरात अभिर, गुलालाची उधळण करण्यात येईल.

या वेळी भाविकांना सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात येईल. यानंतर जन्मकाळाचा पाळणा सहानंतर उत्सवाचे मानकरी अवधूत नारायण घाटे पुजारी यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात येईल. रात्री ९ वाजता धुपारती १० वाजता पालखी व नंतर शेजारती होईल.

दत्त जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई

दत्त जयंतीनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शन रांगेसाठी तसेच निवाऱ्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत. पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. मंदिर आवारात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. भाविकांना देण्यात येणाऱ्या सूचनासाठी ध्वनी क्षेपक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सुरळीत वाहतुकीसाठी विशेष पोलीस यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

भाविकांसाठी दुपारी १२ ते ३ या वेळेत महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे. ग्रामपंचायत, देवस्थान समिती, नानासाहेब धर्माधिकारी सेवा संस्था, वजीर रेस्क्यू फोर्स, दत्त हायस्कूल स्वयंसेवक यांचे दत्त जयंती यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी विशेष सहकार्य मिळत आहे.

हेही वाचा : 

Back to top button