कोल्हापूर : स्ट्रीट लाईट… कागदावर सुरू, रस्त्यावर बंद! | पुढारी

कोल्हापूर : स्ट्रीट लाईट... कागदावर सुरू, रस्त्यावर बंद!

कोल्हापूर, सतीश सरीकर : कोल्हापूर शहरातील रस्त्यावर असलेल्या स्ट्रीट लाईटवर तब्बल 31 हजारांवर एलईडी बसविण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या कागदोपत्री सर्व एलईडी सुस्थितीत असून रात्रभर सुरूच असतात. परंतु, प्रत्यक्षात स्थिती वेगळीच असून शहरवासीय रोज त्याचा अनुभव घेत आहेत. रात्रंदिवस वर्दळ असलेल्या स्टेशन रोडसह अनेक मार्गांवरील एलईडी रात्री दहानंतर बंद असतात. उपनगरांत तर अंधाराचेच साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत. गुन्हेगारीच्या घटनांतही वाढ झाली आहे. परिणामी, ‘स्ट्रीट लाईट… कागदावर सुरू अन् रस्त्यावर बंद’ अशी अवस्था झाली आहे.

कोल्हापुरात विद्युत खांबावर पूर्वी पांढर्‍या ट्यूब आणि हॅलोजन बल्ब होते. 250 व्हॅट, 150 व्हॅट, 120 व्हॅटच्या बल्बमुळे सर्वत्र उजेड असायचा. परंतु, काही वर्षांपूर्वी केंद्र शासन व राज्य शासनाने ऊर्जा बचतीसाठी एका कंपनीमार्फत त्या त्या शहरात एलईडी बसविण्याचे आदेश दिले.

कोल्हापूर महापालिकेतही शासन आदेशाची अंमलबजावणी झाली. महापालिकेने संबंधित कंपनीसोबत 7 जानेवारी 2019 रोजी करार केला. त्यानुसार कंपनीच्या वतीने पहिल्यांदा 20 हजार 834 एलईडी बसविण्यात आल्या होत्या. परंतु, त्यानंतरही शहरात सर्वत्र अंधार पसरू लागल्याने वेगवेगळ्या कंपनीचे 31 हजार 241 एलईडी दिवे लावण्यात आले आहेत.

कंपनीच्या वतीने कोल्हापुरात विद्युत खांबावरील सर्व बल्ब बदलण्यात आले; मात्र 150 व्हॅटच्या ठिकाणी संबंधित कंपनीच्या वतीने 50 व्हॅटचे एलईडी बसविण्यात आले आहेत. परिणामी, नगरसेवकांतून तीव्र संताप व्यक्त होऊ लागला. त्यामुळे सर्व्हे करून एलईडी बसविण्याचे आदेश तत्कालीन सभागृहात झाले. त्यासाठी 10, 20, 30 मीटर या रस्त्याच्या रुंंदीनुसार एलईडी बसविण्याचे ठरले. शहरातील विविध चौकांत तेथील गरजेनुसार जास्त व्हॅटचे एलईडी बसवावेत, असेही सांगण्यात आले; मात्र त्याची काटेकोर अंमलबजावणी झाली नाही.

वीज बचतीच्या नावाखाली अख्या शहरात कमी व्हॅटचे एलईडी बसविण्यात आले आहेत. त्यामुळे उपनगरात अंधाराचे साम—ाज्य पसरले आहे. संबंधित कंपनीकडे 7 वर्षे देखभाल-दुरुस्ती आहे. बसविलेल्या एलईडी आणि मेंटेनन्ससाठी संबंधित कंपनीला महिन्याला 26 लाख 55 हजार द्यायचे आहेत. कंपनीला या सात वर्षांत करारानुसार महापालिकेने तब्बल 22 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या वतीने 12 टक्के वीज बचतीचा दावा केला जात आहे. सायंकाळी रात्र पडू लागल्यानंतर पहाटे उजेड येईपर्यंत सर्व बल्ब सुरू राहणे अत्यावश्यक आहे. परंतु, शहरातील वीजच गायब असते. मग, विजेची बचत होणारच की, असा मुद्दा आहे.

वीज बचतीचा दावा

शहरातील स्ट्रीट लाईटचे बिल महापालिका भरते. महापालिकेला 2017-18 मध्ये 9 कोटी, 2018-19 मध्ये 8 कोटी 22 लाख, 2019-20 मध्ये 8 कोटी 15 लाख, 2020-21 मध्ये 8 कोटी 50 लाख आणि 2021-22 मध्ये 8 कोटी 50 लाख वीज बिल आले होते. एलईडीच्या वीज बचतीमुळे महिन्याला सुमारे 7 ते 8 लाखांची बचत होत असल्याचा महापालिका अधिकार्‍यांचा दावा आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर अंधार

कोल्हापुरातील तावडे हॉटेल ते कावळा नाका, व्हिनस कॉर्नर, दसरा चौक हा मुख्य स्टेशन रोड, कसबा बावडा ते शिये फाटा, मिलिटरी कॅम्प ते विद्यापीठ, सायबर रोड, कळंबा रोड, फुलेवाडी रोड याबरोबरच शहरातील मुख्य रस्ते वगळता रात्रीच्यावेळी अनेक रस्त्यांवरील एलईडी बंद असतात. शहरातील प्रमुख रस्त्यांवरील एलईडीसुद्धा रात्री अकरानंतर बंद केल्या जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत. यापूर्वी काही जणांचा हकनाक बळी गेला आहे. त्याबरोबरच गुन्ह्यांच्या घटनातही वाढ झाली आहे.

एलईडी दिवे व संख्या

18 व्हॅट   147
24 व्हॅट  2,183
32 व्हॅट 00
35 व्हॅट 9,575
190 व्हॅट 15
45 व्हॅट 02
70 व्हॅट 12,864
75 व्हॅट 09
110 व्हॅट 6,135
140 व्हॅट 311
एकूण 31,241

वर्षभरातील तक्रारी

जानेवारी 528
फेब्रुवारी 502
मार्च 613
एप्रिल 758
मे 653
जून 690
जुलै 1005
ऑगस्ट 1422
सप्टेंबर 1570
ऑक्टोबर 1340
नोव्हेंबर 1730
एकूण 10,811

Back to top button