शिये ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार तपास पूर्ण; अहवाल जि.प.सीईओंकडे | पुढारी

शिये ग्रामपंचायतीचा भ्रष्टाचार तपास पूर्ण; अहवाल जि.प.सीईओंकडे

शिरोली एमआयडीसी, पुढारी वृत्तसेवा : शिये ता. करवीर येथील ग्रामपंचायतमध्ये चौदा व पंधराव्या वित्त आयोग निधीमध्ये कामे न करता ग्रामसेवकामार्फत खोटी कागदपत्रे तयार करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार शेतकरी संघटनेने जि.प.कडे केली होती. जि.प.प्रशासनाकडून या तक्रारीची गंभीर दखल घेतली व अखेर विस्तार अधिकारी यांनी तपास करून हा ३२९ पानी अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण यांना सादर केला. या अहवालात ग्रामपंचायतीवर ठपका ठेवत कारवाई ची शिफारस केली आहे. या कारवाईची प्रक्रिया चालू केली असून दोषींवर येत्या काही दिवसांत ठोस कारवाई करणार असल्याची माहीती शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली आहे.

ग्रामपंचायतींची प्रभागावार आराखड्याप्रमाणे निधीची तरतूद असते. परंतू येथे कुठेही कामेच दिसत नसतांना कुशल बुध्दीचा वापर करत शिये ग्रामपंचायत पदाधिका-यांनी ग्रामसेवकांच्या माध्यमातून खोटी कागदपत्रे बनवून निधी लाटल्याचे शेतकरी संघटनेला माहिती मिळाली होती. त्यांनंतर याबाबत तक्रार दाखल केली होती. पण या गंभीर भ्रष्टाचाराची दखलच घेतली नसल्यामुळे संघटनेने आंदोलनाचे हत्यार उपसल्याने अखेर प्रशासनाला दखल घ्यावीच लागली होती .

शेतकरी संघटनेला हा तपास अहवाल इतक्या पाठविलेला असुन हा अहवाल गंभीर स्वरूपाचा आहे की अंतिमतः कारवाई करण्याची मागणी केली. या प्रकरणी दि.२५ नोव्हेंबर २२ रोजी जि.प.समोर ठिय्या आंदोलन होणार होते परंतू भ्रष्टाचारातील संबंधीतांवर १५ दिवसांत कडक कारवाई करण्याचे संकेत दिल्यामुळे हे आंदोलन संघटनेने तात्पुरते स्थगित केले होते .

संघटनेला दिलेल्या संक्षिप्त अहवालात अनेक गंभीर ठपके ठेवताना गरज पडल्यास वरीष्ठ यंत्रणेचे सहकार्य घ्यावे लागेल असे नमूद केले आहे.यासह सन २०१८ पासूनचे सरकारी आडीट रिपोर्ट तपासणी वेळी उपलब्ध नव्हते असाही गंभीर शेरा मारला आहे. त्यामुळे प्रकरणाची पाळेमुळे खणून काढल्यास चौदा व पंधराव्या वित्त निधि मध्ये कोट्यावधी रूपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येईल असे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

यांसह ग्रामपंचायतच्या मतानुसार बोगस कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करून सुरू केलेल्या बार प्रकरणातही मोठा गैरव्यवहार झाल्यावरून संघटनेने उपोषण केले होते याबाबतची तक्रारही जिल्हाधिकारी यांच्याकडे केली असून तोही प्रकार उघडकीस येणार आहे. संघटनेला मिळालेल्या माहितीनुसार वरीष्ठ यंत्रणेकडून शिये ग्रामपंचायतीची गोपनीय चौकशी करण्यात येणार आहे.

 

Back to top button