कोल्हापूर : तलवारीने सतरा वार करून अट्टल गुन्हेगाराचा खून | पुढारी

कोल्हापूर : तलवारीने सतरा वार करून अट्टल गुन्हेगाराचा खून

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  राजेंद्रनगरातील गँगवॉरचा रविवारी भडका उडाला. रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा पाठलाग करून भररस्त्यात निर्घृण खून करण्यात आला. कुमार शाहूराज गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी) असे त्याचे नाव आहे. आठ ते दहा हल्लेखोरांनी तलवारी, एडक्याच्या साहाय्याने त्याच्यावर 17 वार केले. टाकाळा खणीजवळ ही घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुमार गायकवाड हा त्याचा मामा त्र्यंबक गवळी यांच्याकडे आईसह राहत होता. रविवारी रात्री त्र्यंबक गवळी हे जमिनीच्या व्यवहारानिमित्त ताराराणी चौकात आले होते. यावेळी कुमारही त्यांच्या बरोबर होता. मात्र, दोघे वेगवेगळ्या दुचाकींवरून आले होते. याचवेळी कुमारच्या मागावर असलेल्या हल्लेखोरांनी कावळा नाका अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोरून त्याचा पाठलाग सुरू केला. त्यांना पाहून कुमार टेंबलाई उड्डाणपुलापलीकडे गेला. मात्र, टाकाळा येथील खणीजवळ त्याला हल्लेखोरांनी गाठले. या ठिकाणी त्याच्यावर सपासप वार केले. हल्ल्यात एका तलवारीची मूठ तुटून या ठिकाणी पडली होती.

हल्लेखोर पसार

कुमार अचानक निघून गेल्याने त्याचे मामा त्र्यंबक गवळी त्याच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते; पण तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे ते दुचाकीवरून टेंबलाई उड्डाणपुलाखाली आले. तेथे त्यांना कुमार रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. त्यांनी दुचाकीवरूनच त्याला सीपीआरला नेेण्याचा प्रयत्न केला. वाटेत त्यांना एक रुग्णवाहिका मिळाली. त्यातून त्याला रुग्णालयात आणले.

डोक्यात चार गंभीर वार

कुमारच्या डोक्यात चार ठिकाणी वर्मी घाव घालण्यात आले होते. तसेच अंगावर दहा ते बारा वार झाले होते. -मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

राजेंद्रनगरात तणाव

कुमार गायकवाड याचा खून झाल्याची माहिती मिळताच सीपीआरमध्ये तसेच राजेंद्रनगरातही गर्दी जमली होती. स्थानिक गुन्हे शाखा, राजारामपुरी पोलिस राजेंद्रनगरात दाखल झाले. या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कुमारचे नातेवाईक बाळू, अमर, जोकर यांची नावे संशयित म्हणून घेत होते.

कुमारच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे

मृत कुमार गायकवाड याच्यावरही मारामारी, खुनाचा प्रयत्न, असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बिंदू चौक सबजेलमधून बाहेर पडतानाचा त्याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्याने ‘किंग ऑफ कोल्हापूर’ अशा नावाचे एक इन्स्टाग्राम अकाऊंट काढले होते.

Back to top button