कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा कळप; जयंती नाला-महावीर महाविद्यालयामागे वावर | पुढारी

कोल्हापुरात पुन्हा गव्यांचा कळप; जयंती नाला-महावीर महाविद्यालयामागे वावर

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  कोल्हापूर शहरात बुधवारी सायंकाळपासून तीन गव्यांचा जयंती नाला ते महावीर महाविद्यालयाच्या पिछाडीस असलेल्या शेतात मुक्त वावर आहे. शहरात पुन्हा गवे आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करवीर तालुक्यातील खुपीरे, वडणगे परिसरात गव्यांच्या कळपाचा वावर होता. या परिसरात ऊसतोड सुरू असल्याने रात्रीची नागरिकांची वर्दळ वाढल्यामुळे हा कळप शहराच्या दिशेने आल्याचा अंदाज आहे.

बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास या परिसरातील एका रुग्णालयाजवळच्या रस्त्यावरच हा कळप आला. मात्र, वर्दळीमुळे तो पुन्हा शेतात गेला. काही नागरिकांनी गव्याचा कळप पाहिल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले. गव्यांची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभागाचे बचाव पथक तातडीने घटनास्थळी आले. वनक्षेत्रपाल रमेश कांबळे, वनपाल विजय पाटील व पथक परिसराची पाहणी करत असताना बचाव पथकातील कर्मचार्‍यांनाही तीन गवे दिसले. वन विभागाने पथकातील वन कर्मचार्‍यांची संख्या वाढवली. गवे शहरातील नागरी
भागात घुसणार नाहीत, याची दक्षता घेत कर्मचार्‍यांकडून परिसरात रात्री गस्त सुरू केली.

या परिसरात तीन गवे असून, ते मध्यम वयाचे आणि पूर्ण वाढ झालेले आहेत. हे गवे नागरी वस्तीत न येता आलेल्या मार्गानेच वडणगेच्या दिशेने माघारी जातील, याद़ृष्टीने वन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे विजय पाटील यांनी सांगितले. नागरिकांनीही या परिसरात विनाकारण गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
गेल्यावर्षीही डिसेंबर महिन्यात शहरात गव्यांनी धुमाकूळ घातला होता. भुयेवाडीतील एका तरुणाचा गव्याच्या धडकेत बळीही गेला होता. आता पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Back to top button