कोल्हापूर : ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी, मोर्चेबांधणीला येणार वेग; अनेक ठिकाणी होणार सोयीच्या आघाड्या | पुढारी

कोल्हापूर : ४७५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी, मोर्चेबांधणीला येणार वेग; अनेक ठिकाणी होणार सोयीच्या आघाड्या

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी बुधवारी सुरू झाली. आता मोर्चेबांधणीला वेग येणार असून थेट सरपंचपदासाठीही निवडणूक होणार असून, महिनाभर जिल्ह्यात राजकीय धुरळा उडणार आहे. इच्छुकांची चाचपणी सुरू झाली असून अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या होणार आहेत.

करवीर तालुक्यात राजकीय पारा वाढणार

  •  कसबा बावडा : करवीर तालुक्यातील 53 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यात वडणगे, पाचगाव अशा मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. निवडणुकांसंबंधित नोटीस 18 नोव्हेंबर रोजी तहसीलदार जारी करतील. त्यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रामध्ये बुधवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. तालुक्यात निवडणुकांच्या अनुषंगाने आता राजकीय पारा वाढणार आहे. माजी मंत्री आ. सतेज पाटील, आ. पी. एन. पाटील, माजी आ. चंद्रदीप नरके, संपतबापू पवार यांचे गट या निवडणुकीत हिरिरिने उतरणार आहेत.

गगनबावडा : गटागटांत होणार लढती

  •  गगनबावडा : गगनबावडा तालुक्यात 21 ग्रामपंचायतींसाठी बिगुल वाजले असून तिसंगी, शेळोशी, असळज, साळवण या मोठ्या गावांचा समावेश आहे. निवडणुकीचा बार उडणार आहे. गगनबावडा तालुक्यात आगामी काळात स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण यानिमित्ताने तापणार आहे. गगनबावडा तालुक्यात आमदार सतेज पाटील, पी. जी. शिंदे, चंद्रदीप नरके, महाडिक असे वेगवेगळे गट कार्यरत असले तरी स्थानिक पातळीवरील गटागटांमध्ये या निवडणुका होणार आहेत.

शाहूवाडी : हालचाली गतिमान

 बांबवडे : शाहूवाडी तालुक्यातील मुदत संपलेल्या 49 ग्रामपंचायतींचा पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. आगामी काळात होणार्‍या जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती निवडणुकांची ही रंगीत तालीम आहे. बांबवडे, सरूड, पिशवी, साळशी कडवे, कापशी, भेडसगाव, रेठरे, चरण, शाहूवाडी, कोतोली या मोठ्या गावांबरोबर अन्य छोट्या गावांमध्ये या निवडणुका चुरशीने होणार असून स्थानिक व तालुका नेत्यांनी वर्चस्वासाटी कंबर कसली आहे.

कागल : चार गटांत होणार रंगतदार लढती

  •  कागल : कागल तालुक्यातील 28 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील राजकारणाला वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या निवडणुकांकडे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले होते. थेट जनतेतून सरपंच निवड होणार असल्याने इच्छुकांची संख्या गावोगावी वाढलेली आहे. या निवडणुका माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट या चार गटांमध्ये निवडणुका होणार आहेत. मात्र, स्थानिक पातळीवर कार्यकर्ते आपापल्या सोयीच्या आघाड्यांच्या जोडण्या लावत आहेत .

राधानगरी : नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

  •  कौलव : राधानगरी तालुक्यातील तब्बल 66 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे तालुक्यात चांगलीच राजकीय रणधुमाळी उडणार आहे. यामध्ये प्रमुख राजकीय नेत्यांच्या गावांचा समावेश असल्यामुळे त्यांची प्रतिष्ठाही पणाला लागणार आहे. तालुक्यातील राधानगरी, राशिवडे बुद्रुक, सोळांकूर, ठिकपुर्ली, कौलव, कसबा तारळे, घोटवडे, धामोड, शिरगाव, चंद्रे या राजकीयद़ृष्ट्या संवेदनशील गावांतील निवडणुका होणार असल्यामुळे सर्वच पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सत्तेसाठी तारांबळ उडणार आहे. निवडणुकीसाठी गेले दोन-तीन महिने इच्छुकांनी मोर्चेबांधणी चालवली होती. आता निवडणूक जाहीर होताच राजकीय आघाडीवर ऐन थंडीत हवा तापणार आहे.

चंदगड : 40 गावांत राजकीय धुळवड

  •  चंदगड : चंदगड तालुक्यातील 40 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी काही दिवसांतच सुरू होणार आहे. सुगी हंगामात राजकीय धुळवड चांगलीच रंगणार असल्याचे गावागावांतील गटांत संघर्ष दिसून येत आहे. अधिक लोकसंख्या असलेल्या अडकूर, हेरे, जंगमहट्टी, कुदनूर, राजगोळी खु., शिनोळी या गावांत संघर्षाची धार अधिक असल्याचे दिसून येते.

भुदरगड : वातावरण तापणार

  •  गारगोटी : भुदरगड तालुक्यात 44 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील राजकीय वातावरण ऐन हिवाळ्यात तापणार आहे. तालुक्यात शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, भाजप, उद्धव सेना, मनसे या राजकीय पक्षांचे कमी अधिक प्रमाणात कार्यरत आहेत. या सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी आपल्या ताब्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतींची सत्ता राहण्यासाठी व्यूव्हरचना आखली आहे.

गडहिंग्लज : 34 ग्रा.पं.त जुगलबंदी रंगणार

  •   गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील 34 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागल्या असून यामध्ये सहा मोठ्या गावांसह गावांचा राजकीय धुरळा जोरदार उडणार आहे. तालुक्यातील महागाव, हरळी खुर्द, हिडदुग्गी, हडलगे, बटकणंगले, कौलगे, बेकनाळ, भडगाव, कडगाव, करंबळी,मुगळी, खमलेटी, शिप्पूर तर्फ नेसरी, सांबरे, नेसरी, कडलगे या बड्या गावांचा समावेश आहे. गाव पुढार्‍यांची यानिमित्ताने आता चांगलीच जुगलबंदी रंगणार आहे.

पन्हाळा : नेते, कार्यकर्ते लागले कामाला

  •  पन्हाळा : पन्हाळा तालुक्यातील 50 ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायत सदस्य पदासह थेट सरपंच निवडीचा निवडणूक कार्यक्रम शासनाने जाहीर केला आहे. यवलूज, कोतोली, कोलोली, आसूर्ले सह 50 गावांच्या ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे इच्छुकांची चाचपणी सुरू झाली असून नेत्यांसह कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
    आजरा तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींचा बिगुल वाजला
  • आजरा : ग्रामीण भागात प्रतीक्षेत असणार्‍या आजरा तालुक्यातील 36 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होत आहे, यामुळे ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग येणार आहे.
    तालुक्यातील निम्म्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या सत्रात होणार असल्याने तालुकास्तरीय नेत्यांचे गट कामाला लागले आहेत. उत्तूर, भादवण, वडकशिवाले, खेडे या राजकीयद़ृष्ट्या संवेदनशीन गावांतील निवडणुका या टप्प्यात होणार असल्याने तालुक्याचे लक्ष या ग्रामपंचायत निवडणुकांकडे लागून राहिले आहे.

हातकणंगले तालुक्यातील 39 ग्रामपंचायतींचे पडघम

  •  हातकणंगले : हातकणंगले तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील 39 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यामध्ये इचलकरंजी विभागातील 10 तर हातकणंगले तहसील कार्यालयांतर्गत 29 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर मुदत संपणार्‍या 39 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदारयादी जाहीर करण्यात आली आहे. 31 मे 2022 पर्यंत अस्तित्वात असलेली मतदार यादी गृहित धरण्यात आली आहे. 39 ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. मुदती संपतील तसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत.

शिरोळमध्ये सतरा ग्रामपंचायतींचा धुरळा

  •  जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यातील सतरा ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, स्वाभिमानी, काँग्रेस, शिवसेना, भाजप यासह स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून या निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या पूर्वीच या ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार असल्याने राजकीय हालचाली गतिमान होणार आहे. त्याचबरोबर या सतरा गावांमध्ये लोकनियुक्त सरपंच निवडण्यात येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीला विशेष
    महत्त्व आहे.

Back to top button