कोल्हापुरात पुन्हा 2 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त | पुढारी

कोल्हापुरात पुन्हा 2 कोटींची व्हेल माशाची उलटी जप्त

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मध्यवर्ती बसस्थानक ते परिख पूल रस्त्यावर व्हेल माशाची तस्करी करणार्‍या टोळीतील तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून 2 कोटी 1 लाख रुपये किमतीची 2 किलो 15 ग्रॅम वजनाची व्हेल माशाची उलटी जप्त करण्यात आली.

अटक केलेले तिघेही स्थानिक आहेत. तस्करी करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश करण्याच्या सूचना वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
करण संजय टिपुगडे (27, रा. राम गल्ली कळंबा, ता. करवीर), संतोष अभिमन्यू धुरी (49, लिशा हॉटेलजवळ कदमवाडी), जाफर सादिक महंमद बाणेदार (40, नवीन वाशी नाका, कोल्हापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आंतरराज्य तस्करी टोळीशी संबंधित असावेत, असा संशय स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी व्यक्त केला.

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणार्‍या टोळीला दोन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. टोळीचा म्होरक्या प्रदीप शाम भालेराव (रा. मुंबई) याच्यासह तिघांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. या टोळीकडून 3 कोटी 41 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या कारवाईनंतर अवघ्या काही तासात आणखी एका टोळीचा छडा लावून पथकाने दोन कोटींचा मुद्देमाल जप्त केला.

सोमवारी टोळीतील संशयित मध्यवर्ती बसस्थानक – परिख पूल रस्त्यावर व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळताच संजय गोर्ले यांच्यासह पथकाने सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. मोपेडच्या झडतीत उलटी मिळाली आहे.

Back to top button