Kiran Lohar : टोंगा युनिव्हर्सिटीला ठेंगा दाखवून मिळवली डॉक्टरेट! | पुढारी

Kiran Lohar : टोंगा युनिव्हर्सिटीला ठेंगा दाखवून मिळवली डॉक्टरेट!

कोल्हापूर : प्रवीण मस्के ; माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना किरण लोहार ( Kiran Lohar) याने चार वर्षांच्या काळातील वैयक्तिक मान्यतेपासून वरिष्ठ, निवड श्रेणी, पेन्शन मंजुरीच्या प्रकरणांसाठी लाखो रुपयांचा मलिदा खाल्ल्याची चर्चा  सुरू आहे. ‘लोहारा’वरच लाचलुचपतचा हातोडा पडल्याने कोल्हापुरातील अनेकांचे धाबे दणाणले आहे. टोंगा युनिव्हर्सिटीचा बोगस डॉक्टर गजाआड झाल्यानंतर काहींची ‘हाताची घडी, तोंडावर बोट’ अशी अवस्था झाली आहे.

Kiran Lohar : लाचखोर शिक्षणाधिकारी लोहारांचे कारनामे! 

सोलापूर जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी किरण लोहार याला २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. रत्नागिरी व्हाया कोल्हापूरमार्गे सोलापूर अशा लोहार याच्या वादग्रस्त कारकिर्दीची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. चार वर्षांपूर्वी कोल्हापुरात माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाचा कार्यभार त्याने स्वीकारला. त्यानंतर लोहारने प्रतिमा उंचावण्यासाठी अनेक प्रयत्न केले. अनेक शिक्षक संघटना नेत्यांशी त्याने चांगले संबंध प्रस्थापित केले.

‘कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा’ या विद्यापीठाकडून मानद पीएच.डी. पदवी लोहारने घेतली. त्याला पीएच.डी. दिल्यानंतर शिक्षक संघटना नेत्यांनी शहरभर मोठे डिजिटल होर्डिंग लावले होते. यानिमित्ताने मोठा कार्यक्रम घेण्यात आला. कळंबा रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाचाही कार्यक्रम पार पडला. ही पदवी खोटी असल्याचा संशय आल्याने काहींनी आक्षेप घेत पुण्यातील वानवडी पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला; पण ज्यांच्याकडून ही पदवी देण्यात आली ती संस्थाच मुळात बोगस असल्याचे शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झाले. टोंगा देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचे स्पष्टीकरण दिले. तरीदेखील लोहार याच्यावर शासनाने काहीही कारवाई केली नाही.

माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना लोहारने मागील तारखेची कागदपत्रे दाखवून अनेकांना वैयक्तिक मान्यता दिल्या. यासाठी १० ते २५ लाख रुपयाचे शिक्षकांमधून बोलले जात आहे. यातील काही जणांनी शेती विकून, कर्ज काढून हे पैसे दिल्याचे समजते. कोल्हापुरातील एका हायस्कूलमधील त्याचा शिक्षक एजंटगिरी करत होता. त्याच्यामार्फतच कामे केली जायची, अशी शिक्षण वर्तुळात चर्चा आहे. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाने रजा मंजुरी, वरिष्ठ, निवड श्रेणी, बदली प्रस्ताव, वैद्यकीय बिले प्रतिपूर्ती, वैयक्तिक मान्यता अशा अनेक प्रकरणांच्या तक्रारी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केल्या. ११ तक्रारीची पुराव्यांसह कागदपत्रे जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर केली. एका शिक्षकाकडे तीन लाख रुपयांची लाच मागितल्याने २०१८ मध्ये लोहारला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा ठराव झाला होता. प्रशासनाने समिती नेमूनही त्या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. संघटनेने शिक्षण सचिव, संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला; परंतु त्याच्यावर कारवाई झाली नाही. लाचखोरीप्रकरणी न्यायालयाचा निकाल काहीही लागो, अशा व्यक्तींना थेट घरचा रस्ता दाखवावा, अशी मागणी आता पुढे येत आहे.

 भुदरगड येथील एका शाळेचे दोन ठिकाणी एकाच नावाने स्थलांतर करण्याचा प्रताप केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. स्थलांतरित अनधिकृत शाळेतील शिक्षकांना पगार मिळत आहे. परंतु, जे दुसऱ्या शाळेत आहेत ते अद्याप पगारापासून वंचित आहेत. चंदगड येथील शिक्षिका ऑगस्ट १९९३ मध्ये सेवेत रुजू झाल्या. मात्र, ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराअभावी अनेक वर्षे वैयक्तिक मान्यता रखडली होती. न्यायालयाच्या निकालानंतर वैयक्तिक मान्यता २०२२ मध्ये मिळाली; मात्र अद्याप एक रुपयाही पगार त्यांना मिळालेला नाही.

एका शाळेचे दोन ठिकाणी एकाच नावाने स्थलांतर

भुदरगड येथील एका शाळेचे दोन ठिकाणी एकाच नावाने स्थलांतर करण्याचा प्रताप केल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे. स्थलांतरित अनधिकृत शाळेतील शिक्षकांना पगार मिळत आहे. परंतु, जे दुसऱ्या शाळेत आहेत ते अद्याप पगारापासून वंचित आहेत. चंदगड येथील शिक्षिका ऑगस्ट १९९३ मध्ये सेवेत रुजू झाल्या. मात्र, ‘अर्थपूर्ण’ व्यवहाराअभावी अनेक वर्षे वैयक्तिक मान्यता रखडली होती. न्यायालयाच्या निकालानंतर वैयक्तिक मान्यता २०२२ मध्ये मिळाली; मात्र अद्याप एक रुपयाही पगार त्यांना मिळालेला नाही.

Back to top button