डॉ. ग. गो. जाधव अध्यासन इमारत उभारणीस साडेचार कोटींचा निधी | पुढारी

डॉ. ग. गो. जाधव अध्यासन इमारत उभारणीस साडेचार कोटींचा निधी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : दै.‘पुढारी’चे संस्थापक संपादक पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांची शिवाजी विद्यापीठात होत असलेल्या अध्यासनाच्या इमारत उभारणीस एकाचवेळी साडेचार कोटी रुपयांचा निधी दिला असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

कोल्हापूर दौर्‍यावर असताना त्यांनी माध्यमांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, डॉ. ग. गो. जाधव यांचे पत्रकारिता क्षेत्रासह महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतील योगदान मोठे आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक लढ्यातील अग्रणी प्रबोधनकार ठाकरे यांच्यासह थोर व्यक्तींशी त्यांची तुलना होऊ शकते. शिवाजी विद्यापीठात डॉ. ग. गो.जाधव यांच्या नावाने देशातील पत्रकारितेचे पहिले अध्यासन होत आहे. सध्या इमारत उभारणीचे काम सुरू आहे.

यावर्षी अध्यासनाची इमारत पूर्ण करण्यात येणार असून यादृष्टीने साडेचार कोटी रुपयांना निधी तात्काळ उपलब्ध करुन दिला आहे. डॉ. ग.गो. जाधव यांचे कार्य लक्षात घेता कोल्हापूरकरांच्या जिव्हाळा व आत्मियतेचा विषय असणार्‍या अध्यासनाचा प्रकल्प लवकरच पूर्ण होण्याच्या द़ृष्टीने जिल्हा प्रशासनास सूचना दिल्या आहेत. डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या माध्यमातून चालणारे सर्व अभ्यासक्रम, उपक्रम पत्रकारितेला नवी दिशा देणारे ठरतील, असेही मंत्री केसरकर यांनी सांगितले.

Back to top button