इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता | पुढारी

इचलकरंजी : सुळकूड पाणी योजनेला प्रशासकीय मान्यता

इचलकरंजी, पुढारी वृत्तसेवा : इचलकरंजी शहरासाठी जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या दूधगंगा नदीवरील सुळकूड पाणी योजनेस अखेर गुरुवारी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यामुळे पाणी योजनेतील मुख्य अडथळा दूर झाला आहे. 160.84 कोटी प्रकल्प खर्च आहे. पाणी येण्यासाठी सर्वाधिक निधी मिळवणारी राज्यातील एकमेव इचलकरंजी महानगरपालिका आहे. आयुक्त सुधाकर देशमुख यांचा पाठपुरावा आणि खासदार धैर्यशील माने यांच्या विशेष प्रयत्नामुळे योजना टप्प्यात आली आहे.

पंचगंगा आणि कृष्णा योजना बेभरवशाच्या ठरल्यामुळे वारणा योजनेला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. योजनेचा प्रारंभ झाला होता. परंतु, वारणा काठाकडून कडाडून विरोध झाल्याने योजना बारगळी आणि निधी शासनाने परत घेतला. महाविकास आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे, पाणीपुरवठा समितीचे माजी सभापती विठ्ठल चोपडे यांनी विशेष प्रयत्न करून सुळकूड योजनेचा प्रस्ताव शासनाला सादर केला होता.

दरम्यानच्या काळात आघाडी सरकार कोसळल्याने सुळकूड योजनेचे काय होणार, असा प्रश्न उपस्थित झाला होता. परंतु, आयुक्त सुधाकर देशमुख आणि खासदार माने यांनी पाठपुरावा करून प्राथमिक मान्यता मिळवली होती. परंतु, जीएसटीचे दर वाढल्यामुळे वाढीव दराचा सुधारित प्रस्ताव सादर करावा लागल्यामुळे विलंब झाला. गुरुवारी वाढीव खर्चासह प्रशासकीय मान्यताही मिळाल्याने योजनेतील एक टप्पा पूर्ण झाला.

या प्रकल्पांतर्गत महानगरपालिका क्षेत्रासाठी दूधगंगा नदी, सुळकूड उद्भावावरून थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याकामी महानगरपालिकेमार्फत तातडीने निविदा प्रसिद्ध करून काम सुरू करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.

…असा मिळणार निधी मंजूर निधी 160.84 कोटी

केंद्राचा वाटा 33.33% प्रमाणे 53.61 कोटी
राज्य शासनाचा वाटा 36.67% प्रमाणे 58.98 कोटी
महानगरपालिकेचा वाटा 30% प्रमाणे 48.25 कोटी

..अशी आहे योजना

पाईपलाईन लांबी : 5.5 कि.मी.
रायझिंग मेनसायफन : 17.00 कि.मी.
पाईपचा व्यास : एक मीटर
मोटर पंप एकूण : पाच
पहिल्या टप्प्यात उचलणारे पाणी : 69 एमएलडी
2054 पर्यंत उचलण्याची क्षमता : 89 एमएलडी

Back to top button