कोल्हापूर : धनत्रयोदशीला उदंड खरेदी; बाजारपेठेत मध्यरात्रीही गर्दी | पुढारी

कोल्हापूर : धनत्रयोदशीला उदंड खरेदी; बाजारपेठेत मध्यरात्रीही गर्दी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : वसुबारसने शुक्रवारपासून सुरू झालेल्या दीपोत्सवात शनिवारी उत्साहपूर्ण व धार्मिक वातावरणात धनत्रयोदशी साजरी करण्यात आली. सोमवारी नरकचतुर्दशी दिवाळीचा मुख्य दिवस आहे. त्याबरोबर सायंकाळी श्री लक्ष्मीपूजनही होत आहे. त्यासाठी बाजारपेठेत मध्यरात्रीनंतरही गर्दी कायम होती. धनत्रयोदशीच्या निमित्ताने अंबाबाई मंदिरातील धन्वंतरीच्या मंदिरात भाविकांनी गर्दी केली. श्री अंबाबाईची धन्वंतरीच्या रूपात पूजा बांधण्यात आली.

दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात प्रचंड गर्दी झाली होती. व्यापार्‍यांनी परंपरेप्रमाणे दैनंदिन व्यावसायिक जमा-खर्चाची माहिती लिहिण्यासाठी खतावणी, मालाची आवक-जावक लिहिण्यासाठी लहान खतावणी, पैशांची देवाण-घेवाण लिहिण्यासाठी चार बंदी (नकल) तर ग्राहकांसोबत करण्यात आलेले व्यवहार लिहिण्यासाठी तीन बंदी (खरडा/लांब खतावणी) यांची मुहूर्तावर खरेदी करण्यात आली. अनेक व्यापारी बांधवांनी हळद-कुंकू लावून या चोपड्या व्यवसायाच्या ठिकाणी नेल्या.

डॉक्टर आणि वैद्य मंडळींनी धन्वंतरीची पूजा केली. महिलांनी दारासमोर रंगीबेरंगी रांगोळी काढून त्याभोवती पणत्यांची आकर्षक सजावट केली. घरोघरी व व्यवसायाच्या ठिकाणी धनसंपत्तीची विधिवत पूजा करण्यात आली. दुकानात सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी गर्दी होती.

सोमवारी दिवाळीचा मुख्य दिवस नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन आहे. या पार्श्वभूमीवर महाद्वार रोड, राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी अशा शहरातील विविध भागांतील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. लक्ष्मीपूजन आणि नरकचतुर्दशी एकाच दिवशी असल्याने लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदीसाठीही नागरिकांची धांदल सुरू होती. लक्ष्मी- कुबेर देवतांचे फोटो, लक्ष्मीपूजनासाठी लागणारे साहित्य, लाह्या, चिरमुरे, बत्तासे, फुले खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. शुक्रवारी रात्री पावसाने झोडपल्याने शनिवारी सकाळपासूून बाजारपेठा गर्दीने फुलल्या होत्या. महाद्वार रोडसह सर्वत्र सकाळी नऊ वाजल्यापासूनच खरेदीसाठी लगबग सुरू होती.

मुख्य बाजारपेठेतील प्रचंड गर्दीमुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली. अनेक चौकातील सिग्नलजवळ वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या होत्या. दोन-दोन वेळा सिग्नल पडूनही वाहनधारकांना पुढे जाता येत नव्हते, एवढी गर्दी होती. पावसाने उघडीप दिल्याने दिवसभर बाजारपेठा गजबजल्या होत्या. सलग सुट्ट्या असल्याने खरेदीला अक्षरश: उधाण आले होते. महाव्दार रोड, राजारामपुरीसह बाजारपेठेत मध्यरात्रीनंतरही खरेदीसाठी नागरिकांचा उत्साह आणि गर्दी कायम होती.

Back to top button