Kolhapur Lok Sabha Elections : कोल्हापूरवर वर्चस्वासाठी अटीतटीची,ईर्ष्येची लढाई | पुढारी

Kolhapur Lok Sabha Elections : कोल्हापूरवर वर्चस्वासाठी अटीतटीची,ईर्ष्येची लढाई

चंद्रशेखर माताडे (कोल्हापूर, हातकणंगले )

कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुका सुरुवातीपासून गाजत आहेत. महायुतीच्या उमेदवारीचा घोळ, महाविकास आघाडीच्या पाठिंब्याचा हातकणंगलेतील घोळ, त्यानंतर वादाचे प्रसंग, यातून आता निवडणूक निर्णायक टप्प्यावर आली आहे. कोल्हापूरवर वर्चस्व हे भाजपचे स्वप्न आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते अधोरेखित झाले. कोल्हापूर व हातकणंगले यापैकी एका जागेची मागणी भाजपने केली होती. मात्र, शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार असल्याने दोन्ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आग्रहाने घेतल्या. महायुतीच्या विजयासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होत आहे. विशेष म्हणजे भाजपचा उमेदवार नसला, तरीही मोदी यांची होणारी सभा कोल्हापूरचे राजकीय महत्त्व व भावी वाटचाल स्पष्ट करणारी आहे. महाविकास आघाडीसाठी दि. 1 मे रोजी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची इचलकरंजी व कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. यातून महाविकास आघाडी शक्तिप्रदर्शन करणार आहे. तर दि. 2 व 3 मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापुरात आपल्या उमेदवारांसाठी तळ ठोकणार आहेत.

काही अपवाद वगळता वर्षानुवर्षे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने हे मतदारसंघ आपल्याकडे राखले. पश्चिम महाराष्ट्र त्यातही कोल्हापूर म्हणजे युतीसाठी दुष्काळी भागच अशी टीका करणार्‍या शिवसेनेला 2014 च्या विधानसभा निवडणुकीत 10 पैकी 6 आमदार निवडून देऊन, तर 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी मोडून काढत शिवसेनेचे दोन्ही खासदार निवडून दिले; पण युतीचे सरकार 2014 साली सत्तेवर येऊनही सहापैकी एकाही आमदारास शिवसेना मंत्रिपद देऊ शकली नाही. त्यामुुळे जनतेने शिवसेनेसाठीचा दुष्काळ संपविला असला, तरी युती सरकार येऊनही कोल्हापूरच्या वाट्याला मंत्रिपदाचा दुष्काळच आला.

1999 नंतर हात चिन्ह मतपत्रिकेवर

आता शिवसेना, राष्ट्रवादी अखंड राहिलेली नाही. एकनाथ शिंदे शिवसेना व अजित पवार राष्ट्रवादी भाजपबरोबर आहेत. तर ठाकरे शिवसेना व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आहेत. जिल्ह्यात महायुतीचे विद्यमान खासदार विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार अशी चुरस आहे. कोल्हापूरमध्ये काँग्रेसने शाहू महाराज यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे 1999 नंतर प्रथमच कोल्हापूरच्या मतपत्रिकेवर हात हे चिन्ह झळकणार आहे. महाविकास आघाडीची ताकद शाहू महाराज यांच्यामागे आहे. कोल्हापुरात शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक हे उमेदवार आहेत. त्यांच्यामागे महायुतीच्या नेत्यांची ताकद आहे.

मुख्यमंत्र्यांकडून जोडण्या

भाजपने सर्व पातळ्यांवर प्रयत्न करूनही व तगडा उमेदवार असूनही भाजपला कोल्हापूर जिल्ह्यातील दोनपैकी एकही जागा मिळाली नाही. आपला उमेदवार नाही म्हणून भाजप गप्प बसलेली नाही. हातकणंगले मतदार संघातील भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे यांची बंडखोरी मागे घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरात रात्र जागवून काढली व आवाडे यांच्या माघारीची मोहीम फत्ते करूनच शिंदे यांनी कोल्हापूर सोडले. कोल्हापुरात जोडण्या करण्यात मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली, एवढेच नव्हे तर लगेचच दुसर्‍या दिवशी संजय मंडलिक व धैर्यशील माने यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातीने उपस्थित रहात शिंदे यांनी आपल्या उमेदवारांना बळ दिले.

आता त्यापुढच्या टप्प्यात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा होत आहे. त्यावरून भाजपने तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापूरच्या जागा किती प्रतिष्ठेच्या केल्या आहेत, हे लक्षात येते. आपल्या पक्षाचा उमेदवार वा आपल्या पक्षाचे चिन्ह नसतानाही नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभा घेणे याला राजकीय पातळीवर वेगळे महत्त्व आहे. एका एका जागेसाठी भाजप प्रतिष्ठा पणाला लावत आहे हे तर आहेच; पण मोदी यांची सभा महायुतीच्या भक्कमतेची साक्ष देत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मित्रपक्षाच्या उमेदवारांना ताकद देण्यासाठी येत आहेत, हे वेगळेपण आहे. याचा आता उमेदवार कितपत फायदा उठवितात, यावर त्यांचे यश अवलंबून असेल. मात्र, पंतप्रधानांपासून ते स्थानिक मंत्र्यांपर्यंत सर्वच नेत्यांनी उमेदवारांना ताकद देण्यासाठी कसूर केलेली नाही, हे महत्त्वाचे आहे.

शाहू महाराज यांना ‘वंचित’ व ‘एमआयएम’चाही न मागता पाठिंबा

महाविकास आघाडीतून शाहू महाराज यांना ताकद मिळणे अपेक्षित आहे व आघाडीतील घटक पक्षांचे ते कर्तव्यही आहे. पण राजकीय ताणाताणी सुरू असताना व आघाडीच्या वाटाघाटींचा घोळ ताणला गेला असतानाही डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या बहुजन वंचित आघाडीने कोणतीही खळखळ न करता शाहू महाराज यांना पाठिंबा दिला, त्यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेण्याची तयारीही दाखविली आहे. तर ‘एमआयएम’नेही कोणतीही मागणी नसताना शाहू महाराज यांना पाठिंबा दिला, या शाहू महाराज यांचे वेगळेपण अधोरेखित करणार्‍या राजकीय घटना आहेत.

शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री कोल्हापुरात

महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू महाराज व हातकणंगलेचे उमेदवार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्या प्रचारासाठी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांची इचलकरंजी व कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. एकेकाळी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केलेले माने व सरुडकर यानिमित्ताने समोरासमोर आले आहेत. त्यानंतर दि. 2 व 3 मे रोजी मुख्यमंत्री आपल्या उमेदवारांना ताकद देण्यासाठी कोल्हापुरात मुक्काम करणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा गाठीभेटीवर जास्त भर असेल. आता या सगळ्याचा फायदा कोणाला होणार, हे निकालानंतर स्पष्ट होईल.

Back to top button