कोल्हापुरातील महिलेचा पाडळी खुर्दमध्ये खून | पुढारी

कोल्हापुरातील महिलेचा पाडळी खुर्दमध्ये खून

कोल्हापूर/दोनवडे, पुढारी वृत्तसेवा : धारदार शस्त्राने डोक्यात वार करून महिलेचा खून केल्याची घटना बालिंगा-शिरोली दुमाला मार्गावर पाडळी खुर्द (ता. करवीर) येथील शेतात निर्जन ठिकाणी शुक्रवारी घडली. आरती अनंत सामंत (वय 45, रा. पंचगंगा हॉस्पिटलजवळ, शुक्रवार पेठ) असे या महिलेचे नाव आहे.

हल्लेखोरांसह खुनाचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते. आर्थिक वाद, गुप्तधन अथवा अन्य कारणातून हा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. खुनानंतर साडेचार लाखांचे 9 तोळे दागिनेही हल्लेखोरांनी लंपास केले.

प्राथमिक माहितीनुसार, करवीर पोलिसांनी शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील मांत्रिकासह तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. खुनाच्या नेमक्या कारणांसह हल्लेखोरांची नावेही लवकरच निष्पन्न होतील, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी सांगितले.

पाडळी खुर्द येथील राजवर्धन पाटील यांच्या शेतात निर्जन ठिकाणी अनोळखी महिलेचा मृतदेह ग्रामस्थांच्या निदर्शनास आला. करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजयकुमार सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक संजय गोर्ले, सहायक निरीक्षक सूरज बनसोडेंसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

डोक्यावर वर्मी वार; अतिरक्तस्रावामुळे मृत्यू

पर्समध्ये असलेल्या आधार कार्डवरून खून झालेली महिला शुक्रवार पेठ येथील पंचगंगा हॉस्पिटल परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. हल्लेखोरांनी मातीची वीट, दगड अथवा धारदार शस्त्राने डोक्यावर वर्मी हल्ला केल्याने अतिरक्तस्राव होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले

रात्री उशिरापर्यंत शोधाशोध; त्यात मोबाईलही स्विच ऑफ

ही महिला आंबेवाडी (ता. करवीर) येथे राहत होती. 2006 मध्ये पतीच्या निधनानंतर दोन मुलींसह ती शुक्रवार पेठ येथील आईकडे राहायला आली. एका मुलीचा विवाह झाला असून, दुसरी मुलगी पुण्याला शिक्षण घेत आहे. गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास आरती दुचाकी घेऊन घराबाहेर पडली. ती रात्री उशिरापर्यंत आली नाही. नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा मोबाईलही स्विच ऑफ होता.

गुरुवारी रात्रीपासून मोपेड बेवारस स्थितीत

पाडळी खुर्द रस्त्याकडेला गुरुवारी रात्रीपासून दुचाकी पार्क केल्याचे ग्रामस्थांना दिसले. दुचाकीपासून काही अंतरावर मृतदेह आढळला. त्यामुळे संबंधित महिला ओळखीच्या व्यक्तीसमवेत स्वत: निर्जन ठिकाणी आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे.

हल्लेखोराची महिलेशी झटापट; खरचटल्याचे व्रण

ओळखीच्या व्यक्तीसमवेत बोलत असतानाच पाठीमागील बाजूने हल्लेखोराने महिलेच्या डोक्यावर वर्मी हल्ला केल्याचे दिसून येते. यावेळी झटापट झाल्याचेही व्रण आहेत. हातातील सोन्याच्या चार पाटल्या, मंगळसूत्र असे 9 तोळे दागिनेही संशयितांनी लंपास केल्याचे पोलिस निरीक्षक सिंदकर यांनी सांगितले. महिलेच्या हातावर व शरीरावर खरचटल्याचेही व्रण आहेत.

मांत्रिकाबरोबर आठवड्यापूर्वी वादावादी

सारिका निरंजन दीक्षित (रा. शुक्रवार पेठ) यांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध खुनाची फिर्याद दिली आहे. दीक्षित यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरोली पुलाची येथील 35 वर्षीय एका मांत्रिकासह तिघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. संबंधित मांत्रिकाबरोबर आठवड्यापूर्वी आरतीचा आर्थिक कारणातून वाद झाला होता, अशीही माहिती चौकशीतून पुढे आल्याचे सांगण्यात आले.

अखेरचे संभाषण…

खून झालेल्या आरतीचे भावजय सारिकाशी गुरुवारी सायंकाळी अखेरचे संभाषण झाले. शुक्रवारी रात्री आपण मुंबईला जाणार आहोत, असे आरतीने सांगितले होते. अधिक माहिती विचारण्याचा प्रयत्न करताच, आरती गडबडीत घरातून बाहेर पडल्याचे तपास अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button