कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याला नाव लावायला मी सतेज पाटील नाही – अमल महाडिक | पुढारी

कोल्हापूर : राजाराम साखर कारखान्याला नाव लावायला मी सतेज पाटील नाही - अमल महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावर माझे नाव लावायला मी सतेज पाटील नाही, असे प्रत्युत्तर कारखान्याचे संचालक माजी आ. अमल महाडिक यांनी दिले. गेली 30 वर्षे सत्तेत असताना कारखान्याचा 7/12 आणि नाव आहे तसे जपले आहे. याउलट सतेज पाटील यांनी मात्र सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर काही वर्षातच त्या कारखान्याचे नाव बदलले. ‘अजिंक्यतारा’ या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचा 7/12 आधी कोणाच्या नावावर होता आणि आता कोणाच्या आहे, एवढे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही महाडिक यांनी पत्रकाद्वारे दिले आहे.

राजाराम साखर कारखान्याची सभा 30 सप्टेंबरला होत आहे. कोपर्‍यात लपूनछपून सभा घेणे ही आमची पद्धत नाही. सभेला सर्व सभासद उपस्थित राहून कारखाना योग्य लोकांच्या हाती आहे, यावर पुन्हा शिक्कामोर्तब करतील. एकीकडे सभा सुरळीत व्हावी म्हणून आमचे प्रयत्न सुरू असताना, दुसरीकडे विरोधकांनी मेळावा घेऊन सवयीप्रमाणे आमच्यावर टीका केली. त्यामुळे रात्रंदिवस फक्त 7/12 आणि जमीन एवढेच विचार या व्यक्तीच्या डोक्यात असतात का? असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो. सप्तगंगा साखर कारखाना ताब्यात घेताच कारखान्याचे नाव बदलून 10,000 सभासद एका रात्रीत कमी केले. आज त्या डी. वाय. पाटील साखर कारखान्याची वार्षिक सभा कधी होते? अहवाल छापला जातो का नाही? याची सभासदांना माहिती देखील नसते. त्यामुळे वार्षिक सभा आणि निवडणूक आली की कारखान्याबद्दल बोलण्याची सवय त्यांनी थांबवावी. ‘राजाराम’चा कारभार अतिशय उत्तमरीत्या सुरू असल्याने कारभारावर कुठेही बोट ठेवण्यास जागा नाही.

ज्यांनी स्वतः सहकाराचा गळा घोटण्याचे पाप केले, 2-2 पिढ्यांनी मिळून शासनाच्या, देवस्थानच्या जमिनी लाटल्या, विद्यापीठं लुटली. त्यांनी 3 दशके सहकार टिकवणार्‍यांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असे मला वाटते. ‘सभेनंतर बावड्यातून बाहेर जाणे महाग होईल’ अशी धमकी मेळाव्यात दिली.

बावडा आपली जहागीर असल्यासारखी सतेज पाटील यांनी वक्तव्य करू नये. यापूर्वीही अनेकवेळा त्यांनी पातळी सोडून टीका केली आहे, तेव्हा आम्ही दुर्लक्ष केले. पण इथून त्यांच्याच शब्दात त्यांना उत्तर दिले जाईल, असा इशारा महाडिक यांनी पत्रकातून दिला आहे.

Back to top button