कोल्हापूर : तिहेरी हत्याकांडाने कागलची घरकूल वसाहत हादरली; दुसर्‍या दिवशीही भीती कायम | पुढारी

कोल्हापूर : तिहेरी हत्याकांडाने कागलची घरकूल वसाहत हादरली; दुसर्‍या दिवशीही भीती कायम

कागल/कोल्हापूर; पुढारी वृतसेवा :  कागल-सांगाव रस्त्यावरील नवीन घरकूल वसाहतीत मंगळवारी झालेल्या तिहेरी हत्याकांडाची भीती दुसर्‍या दिवशीही कायम होती. 10 बाय 10 च्या दोन खोल्यांचे घर असे स्वरूप असणार्‍या 300 घरांच्या या वसाहतीत एरवी खुट्ट जरी झालं तरी सहजच गर्दी जमायची. भिंतीला लागून भिंत आणि चौकटीला लागून चौकट असूनही या वसाहतीमध्ये मंगळवारी एवढी मोठी घटना घडूनही या घटनेचा थांगपत्ताच आरोपी प्रकाश माळीने कोणाला लागू दिला नाही. त्याने अतिशय थंड डोक्याने पत्नी आणि दोन्ही मुलांचा खून केला आणि स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाला. ही घटना उघडकीस आल्याच्या दुसर्‍या दिवशीही या वस्तीत सन्नाटा पसरला होता. शेजारची सर्व कुटुंबे घराला कुलूप लावून नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. त्यामुळे या घरकूल वसाहतीत शुकशुकाट होता.

मायलेकरांना ओरडूही दिले नाही

आरोपी प्रकाश धोंडिराम मा?ळी याने छोट्या घरात तिघाजणांचा निर्घृण खून केला, पण या तिघांना ओरडण्याची संधीही त्याने दिली नाही. काहीही झाले तरी यांना संपवायचेच याच रागातून त्याने हे कृत्य केले. पत्नीनेही ओरडण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याने गळा आवळल्याने तिलाही ओरडता आले नाही. दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास पत्नीचा तर दोन तासांनी सायंकाळी 5 च्या सुमारास मुलगा कृष्णाचा त्याने गळा आवळला.

मुलगी आदिती इचलकरंजी येथे महाविद्यालयात शिक्षणासाठी गेली होती. ती रात्री आठ वाजता घरी येईपर्यंत प्रकाश माय-लेकराच्या मृतदेहाजवळ शांतपणे बसून होता. त्याने अजिबात याची कुणकुणही कोणाला लागू दिली नाही. मुलगी येताच घरातील घटना पाहून ती ही हादरून गेली. तिने आरडाओरड सुरू केला, पण कोणाला काही समजायच्या आतच त्या निर्दयी बापाने मुलीच्याही डोक्यात लोखंडी बत्ता घालून तिलाही संपविले. दिवसभरात दर दोन तासांच्या अंतराने एक-दोन नव्हे तर तब्बल तीन खून करूनही त्याने घराच्या बाहेर काही कळू दिले नाही.

शेजारी घाबरून कुलपे लावून गायब

या घटनेने कागल हादरले आहे, पण ज्या वसाहतीत ही घटना घडली ती नवीन घरकूल वसाहत भीतीच्या छायेखाली आहे. प्रकाश माळी यांच्या आजूबाजूला राहणारे सर्व शेजारी घरांना कुलपे लावून नातेवाईकांकडे गेले आहेत. पोलिस आपल्याला काहीतरी विचारतील, आपण काय सांगायचे अशी भीती त्यांना असल्याने शेजारी घराकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे या वसाहतीत शुकशुकाट जाणवत आहे.

दोन वर्षांपासून भांडणे

माळी कुटुंबात गेल्या दोन वर्षांपासून वाद सुरू आहेत. प्रकाश हा एका कार?खान्यात नोकरी करत होता. आर्थिक समस्याही होत्याच. त्यासोबतच गेल्या दोन वर्षांपासून पत्नीवर चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरून त्यांची सतत भांडणे होत होती. हेच कारण या हत्याकांडास जबाबदार असल्याचा संशय पोलिसांना असून पोलिस त्याद़ृष्टीने आता तपास करत आहेत.

आरोपीला पश्चात्तापच नाही

खून करून आरोपी स्वत: पोलिस ठाण्यात हजर झाल्यानंतरच या घटनेची माहिती सर्वत्र वार्‍यासारखी पसरली. त्यानंतर पोलिस घटनास्थळी आरोपी प्रकाशला घेऊन आले. त्यावेळी प्रकाश हा काही घडलेच नाही अशाच आविर्भावात वावरत होता. घटनास्थळी गर्दी होत असतानाच त्यातील काही ओळखीच्या लोकांनाही तो हाक मारत होता. यावेळी पोलिसांनी त्याला दरडावून शांत बसविले. पोलिस घरातील पाहणी करत असताना आरोपी प्रकाश पलंगावर पाय हलवत शांतपणे बसला होता.

खुपिरे हत्याकांडाची आठवण

2004 साली अशाच प्रकारचे हत्याकांड खुपिरे (ता. करवीर) येथे झाले होते. कौटुंबिक वादातून एका कुटुंबप्रमुखाने सारे कुटुंबच संपवून
स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला होता. कागल येथील या तिहेरी हत्याकांडाने खुपिरे येथील हत्याकांडाची आठवण झाली.

Back to top button