कोल्हापूर : भाविकांच्या गर्दीने शहर पॅक | पुढारी

कोल्हापूर : भाविकांच्या गर्दीने शहर पॅक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘उदं गं अंंबे उदं उदं…’, ‘अंबाबाईच्या नावानं चांगभलं…’, ‘अंबा माता की जय’… अशा घोषणा देत आबालवृद्ध भाविक करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी नतमस्तक होत होते. मंगळवारी पहाटेपासून ते रात्री पालखी सोहळ्यापर्यंत भाविकांनी दर्शनासाठी अक्षरश: रीघ लावली होती. नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी म्हणजेच मंगळवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे मंदिर परिसरासह संपूर्ण शहर अक्षरश: पॅक झाले होते. वाहतुकीचे नियोजन आणि गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस व वाहतूक यंत्रणेची दमछाक होत होती.

भाविक दर्शनापासून वंचित होते. यंदा कोरोनाचा कहर कमी झाल्याने प्रशासनाने निर्बंधमुक्त नवरात्रौत्सवाची घोषणा केली होती. यामुळे भाविक मोठ्या संख्येने कोल्हापुरात दाखल होऊ लागले आहेत. पहिल्या दिवशी घरोघरी घटस्थापनेमुळे तुलनेने गर्दी कमी होती. मात्र, मंगळवारी या गर्दीत मोठी वाढ झालेली दिसली.

गर्दीच्या नियोजनासाठी मंदिर परिसरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी बॅरिकेडस् लावण्यात आले हाते. पोलिस, वाहतूक शाखा, देवस्थान समितीचे सुरक्षा रक्षक, गृहरक्षक दलाचे जवान, व्हाईट आर्मीचे स्वयंसेवक यांच्यासह अनेक संस्था, संघटनांतर्फे वाहतुकीसह गर्दीचे नियोजन केले जात होते.

दुर्गारूपात पूजा…

नवरात्रौत्सवाच्या द्वितीयेला (मंगळवारी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची ‘अष्टभुजा सिंहवाहिनी दुर्गा’ रूपात पूजा बांधण्यात आली होती. दुर्गा म्हणजे दुर्गम असुराला मारणारे जगदंबेचे स्वरूप. दुर्गमसुराला मारल्यानंतर माझे नाव दुर्गा म्हणून प्रसिद्ध होईल, असे वचन देवीने स्वतः दिलेले आहे. या स्वरूपात भगवती अष्टभुजा धारण करून सिंहावर विराजमान आहे. हातात शंख, चक्र, खड्ग, धनुष्यबाण, वरद, कमळ, त्रिशूल, तलवार आदी आयुधे धारण करीत असते. देवीची पूजा अनिल कुलकर्णी, आशुतोष कुलकर्णी, सचिन गोटखिंडीकर, श्रीनिवास जोशी आणि गजानन मुनीश्वर यांनी बांधली.

प्रतिभा थोरात यांचे बहारदार गायन

नवरात्रौत्सवांतर्गत देवस्थान समितीच्या वतीने अंबाबाई मंदिरातील गारेच्या गणपतीसमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. मंगळवारी दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम झाले. सायंकाळी पुण्यातील प्रसिद्ध गायिका प्रतिभा थोरात यांच्या बहारदार गायनाचा कार्यक्रम झाला. त्यांच्या गायनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. तत्पूर्वी, दिवसभरात हरिप्रिया भजनी मंडळ, साई महिला भजनी मंडळ, स्वामिनी महिला भजनी मंडळ-हातकणंगले, रुक्मिणी मंडळ-पुणे, भक्तिसेवा मंडळ-हडपसर, संतकृपा भजनी मंडळ, मिलिंद कुलकर्णी यांचा कलाविष्कार, त्यानंतर आई दुर्गा फाऊंडेशन प्रणीत नादब—ह्मा भजनी मंडळाने सादरीकरण करून उपस्थितांना खिळवून ठेवले.

परिसरातील व्यावसायिकांकडे गर्दी

दर्शनासाठी गर्दीमुळे मंदिर परिसरातील हॉटेल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि फेरीवाल्यांकडे खवय्यांची गर्दी झाली होती. याच बरोबर विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू, धार्मिक साहित्य, बालचमूंसाठीची खेळणी, कोल्हापुरी चप्पल, गूळ, मसाले आदींच्या खरेदीसाठीही भाविक-पर्यटकांनी दुकांनामध्ये गर्दी केली होती.

पायी, सायकलवरूनही आगमन

अंबाबाईसह नवदुर्गा दर्शनासाठी स्थानिक तसेच राज्य व देशभरातील भाविक विविध वाहनांतून कोल्हापुरात दाखल झाले होते. काही भाविक पायी चालत तर काही भाविक सायकलींवरूनही दर्शनासाठी आले होते. भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे मंदिराकडे जाणारे सर्व मार्ग दिवसभर फुलून गेले.

अंबाबाई पालखीसाठी अब्दागिरी भेट

अंबाबाईच्या पालखीसाठी करवीर निवासिनी महालक्ष्मी सुवर्ण पालखी ट्रस्ट गुजरीतर्फे सोने व चांदीचे प्लेटिंग केलेल्या 5 किलो वजनाची अब्दागिरी भेट देण्यात आली. यात 183 ग्रॅम चांदी व 10 ग्रॅम सोन्याचा समावेश आहे. याची अंदाजे किंमत 3 लाख 83 हजार इतकी आहे. यावेळी भरत ओसवाल, सौ. अरुंधती महाडिक, देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते. तसेच चिराग रवींद्र रामणकट्टी यांच्याकडून 2 किलो वजनाची अब्दागिरी भेट दिली.

एलईडी स्क्रीनवर दर्शन

दरम्यान, नवरात्रौत्सव कालावधीत विविध देवतांचे दर्शन भाविकांना गर्दीत न जाता जवळून घेता यावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील प्रमुख चौकांत देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने मोठमोठ्या एलईडी स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. बिंदू चौक, मिरजकर तिकटी, महाद्वार चौक यासह शहरातील 10 चौकांत ही व्यवस्था करण्यात आली आहे. याचा लाभ भाविक आवर्जुन घेत आहेत.

‘मेणा’ पालखी

दरम्यान, नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या दिवशी (मंगळवार) रात्री अंबाबाईची पालखी मिरवणूक हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली. जरग परिवाराच्या वतीने पालखीची सजावट मेणा आकारात करण्यात आली होती. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि अंबा माता की जय… अशा जयघोषात पालखी सोहळा झाला.

दोन दिवसांत दोन लाखांहून अधिक भाविक

नवरात्रौत्सव यंदा निर्बंधमुक्त होत असल्याने भाविकांमध्ये मोठा उत्साह आहे. नवरात्रौत्सवाच्या दुसर्‍या माळेला 1 लाख 44 हजार 921 भाविकांनी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले, तर सोमवारी 68 हजार 527 भाविकांनी दर्शन घेतले होते. दोन दिवसांत एकूण 2 लाख 13 हजार 448 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.

Back to top button