कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांत मारामारी | पुढारी

कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप कार्यकर्त्यांत मारामारी

कागल, पुढारी वृत्तसेवा : कागल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांमध्ये मंगळवारी सकाळी किरकोळ कारणावरून हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले; मात्र परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी कागल पोलिस ठाण्याच्या आवारामध्ये दिवसभर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. त्यामुळे पोलिस ठाणे परिसरात तणावाचे वातावरण होते

शाहूनगर बेघर वसाहतीमध्ये सोमवारी रात्री दुर्गामाता उत्सवावरून दोन्ही गटांच्या काही तरुणांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली होती. त्याचे पर्यवसान सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास मारामारीत झाले. बसस्थानकासमोरील एका दुकानासमोर रात्रीच्या भांडणाच्या कारणावरून दोन्ही गटांच्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांचे काही कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले. मारामारीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी कागल पोलीस ठाण्यात दोन्ही गटांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. दोन्हीही गट एकमेकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी आक्रमक बनले होते. दिवसभर दोन्ही गटांचे कार्यकर्ते पोलीस ठाण्याच्या आवारात गर्दी करून होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता

या मारामारी प्रकरणात नसलेली नावे काढून टाकण्यात यावी, यासाठी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना बोलवून पोलिसांनी खरी नावे देण्याची विनंती केली होती. त्यानुसार दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून नसलेल्या लोकांची नावे वगळून गुन्ह्यात असलेली नावे देण्यासाठी उशिरापर्यंत खलबते सुरू होती. गुन्ह्यामधील कलम मजकूर याबाबत देखील चढाओढ सुरू होती. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी वकिलाशी संपर्क साधून त्यांचाही सल्ला घेतला होता. त्यामुळे दिवसभर सुरू असलेल्या या नाट्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये कार्यकर्ते नागरिक यांची गर्दी झालेली होती.

पोलीस ठाण्याच्या परिसरात दिवसभर गर्दी होती. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख तिरुपती काकडे, तसेच करवीर विभागीय पोलीस उपअधीक्षक सुप्रिया पाटील घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांबरोबर उशिरापर्यंत चर्चा सुरू होती.

Back to top button