‘वारणा’ 16 लाख मे. टन उसाचे गाळप करणार | पुढारी

‘वारणा’ 16 लाख मे. टन उसाचे गाळप करणार

वारणानगर, पुढारी वृत्तसेवा : वारणा कारखाना येत्या गळीत हंगामात आधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे प्रतिदिनी 11 हजार मे. टन क्षमतेने 16 लाख मे. टन. उसाचे गाळप करणार आहे. येत्या अडीच वर्षांत साखर, वीज व इथेनॉल विक्रीतून कारखाना कर्जमुक्त करण्याचा संकल्प वारणा समूहाचे अध्यक्ष आ. डॉ. विनय कोरे यांनी आज करून 15 मार्चनंतर गाळपास येणार्‍या उसास प्रतिटन 200 रुपये देण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगितले.
वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची 66 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दोन वर्षांच्या खंडानंतर आज खुल्या पटांगणावर पार पडली. यावेळी डॉ. कोरे अध्यक्षपदावरून बोलत होते.

दीपप्रज्वलन व सहकार गीताने सभेची सुरुवात झाली. श्रद्धांजलीचा ठराव कारखान्याचे सचिव बी. बी. देशिंगे यांनी मांडला. कारखान्याला सलग 50 वर्षे अखंडितपणे आपल्या ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करणारे शेतकरी जयसिंग पाटील (मांगले), विश्वास पाटील (मनपाडळे), रामचंद्र संकपाळ (सागांव) यांचा तसेच शंभर टक्के ऊस पुरवठा करणार्‍या केखले व मनपाडळे या गावातील शेतकर्‍यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी डॉ. कोरे म्हणाले, देशात यावर्षी साखर निर्यात व 20 टक्के इथेनॉल निर्मिती होणार असल्यामुळे साखरेला चांगला दर मिळणार आहे. वारणाने आधुनिकयंत्राचा विस्तार केल्याने 16 लाख मे टनांचे गाळप उद्दिष्ट ठेवले आहे. किमान 40 रुपये दर मिळेल अशी उच्च प्रतीची साखर तयार करणार आहे.

दोन वर्षे बंद असलेला रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित करून 8 लाख मे टन रिफायनरी साखर निर्मिती करून त्यामधून 64 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न राहणार आहे. त्याचबरोबर स्वमालकीच्या उर्जांकूर वीजप्रकल्पातून 100 कोटींपेक्षा अधिक रुपयांचे उत्पन्न वीज विक्रीतून मिळणार आहे. यामुळे कारखान्यावरील आर्थिक बोजा कमी होऊन येत्या अडीच वर्षांत अडचणीतील सहकारी कारखाना कर्जमुक्त कसा होतो? याचे उदाहरण देऊन महाराष्ट्राला तोंडात बोटे घालायला लावू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Back to top button