कोल्हापूर : ‘सार्वजनिक बांधकाम’च्या 450 कोटींच्या कामांना ‘ब्रेक’ | पुढारी

कोल्हापूर : ‘सार्वजनिक बांधकाम’च्या 450 कोटींच्या कामांना ‘ब्रेक’

कोल्हापूर, सुनील सकटे : विविध विकासकामे स्थगित करण्याच्या राज्य शासनाच्या निर्णयाचा फटका सार्वजनिक बांधकाम विभागासह जलसंधारण विभागालाही बसला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला तब्बल साडेचारशे कोटी, तर जलसंधारण विभागाची 60 कोटी अशी दोन्ही विभागांची जिल्ह्यातील तब्बल 510 कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. या कामांना स्थगितीचा अडथळा अद्यापही कायम आहे. त्यामुळे या विभागाचे अधिकारी स्थगिती उठण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाची सुमारे 450 कोटी आणि जलसंधारण विभागाची 60 कोटी रुपयांची कामे रखडली आहेत. दोन्ही विभागांतील सुमारे 510 कोटी रुपयांची कामे रखडल्याने सिंचनांच्या आणि रस्ते विकासाच्या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे. जलसंधारण विभागातर्फे पाझर तलाव कोल्हापूर पद्धतीचे बंधारे उभारणीची कामे केली जातात. महाविकास आघाडी सरकारने जिल्ह्यातील अशा कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून कामे करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाची कोट्यवधी रुपयांची कामे रखडल्याने जिल्ह्यातील रस्ते, इमारतींच्या कामांना ब्रेक लागला आहे. पावसाळ्यानंतर रस्त्यांची कामे सुरू होतात. पावसाळ्यात अशा कामांचे अंदाजपत्रक तयार करणे, डीटीपी तयार करणे अशी कामे होत असतात. मात्र, कामांना स्थगिती असल्याने कोणत्या कामांचे अंदाजपत्रक करावे, डीटीपी करावे या विवंचनेत अधिकारी, कर्मचारी आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारतीची 125 कोटी, तर रस्त्यांची 325 कोटी रुपयांची कामे रखडली आहेत.

निविदा प्रक्रिया सुरू असतानाच राज्य सरकारने मागील सरकारने मंजूर केलेली आणि निविदा प्रक्रिया पूर्ण न झालेली कामे स्थगित करण्याचा आदेश दिला. या आदेशामुळे जिल्ह्यातील लघुपाटबंधारे तलाव आणि पाझर तलावांची 18 कोटी रुपयांची कामे थांबली आहेत, तर 24 कोटी रुपयांची इतर कामे स्थगित झाली आहेत. एकूण 60 कोटी रुपयांची कामे रखडल्याने जलसंधारणाच्या कामांवर परिणाम झालाआहे.

Back to top button