कोल्हापूर : महामार्ग आणखी किती बळी घेणार? | पुढारी

कोल्हापूर : महामार्ग आणखी किती बळी घेणार?

जयसिंगपूर, संतोष बामणे : सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या दुरवस्थेमुळे सर्वसामान्यांना हकनाक आपला जीव गमवावा लागत आहे. कित्येकजण कायमचे जायबंदी होत आहेत. बुधवारी उदगाव येथे खड्ड्यात दुचाकीस्वार पडला आणि पाठीमागून आलेल्या टेम्पोने त्याला चिरडले.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे सत्र सुरू असून त्यात अनेकांचे बळी गेले आहेत. अनेकांना अंपगत्व आले आहे. सध्या सांगली-कोल्हापूर महामार्ग हा राष्ट्रीय प्राधिकरण विभागात वर्ग झाल्याने आता तरी अधिकारी कार्यालयातून बाहेर येऊन महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी पुढाकार घेणार का, असा सवाल उपस्थित होत आहे.

सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या कामाला 20 ऑक्टोबर 2012 रोजी सुरुवात झाली. हे काम 19 ऑक्टोबर 2014 पर्यंत पूर्ण करणे गरजेचे होते. याला 2 जानेवारी 2015 पर्यंत अशी 75 दिवसांची मुदतवाढ मिळाली होती. हा रस्ता सांगली ते शिरोली असा एकूण 52.61 कि.मी.चा होता; मात्र प्रस्तावित टोलच्या विरोधामुळे सुप्रीम कंपनीने काम अपूर्ण ठेवल्याने सांगली-कोल्हापूर महामार्गाला अवकळा निर्माण झाली. त्यानंतर सुप्रीम कंपनीने न्यायालयात धाव घेतल्याने सर्वच काम रखडले. असे असताना 5 वर्षे याकडे एकाही लोकप्रतिनिधीने लक्ष दिले नाही. त्यामुळे या मार्गावरील अपघातांची मालिका लक्षात घेऊन तत्कालीन आरोग्य राज्यंमत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगली-कोल्हापूर महामार्ग हा रत्नागिरी-नागपूर महामार्गात विलीन होण्यासाठी राज्य शासनाकडून तोडगा काढून याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे सादर केला होता. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपूर्वी सांगली-कोल्हापूर महामार्गाचे रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गात विलिनीकरण करण्यात आ. यड्रावकरांना यश मिळाले होते.

त्यांनतर राज्य शासनाने सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 19 कोटींचा निधी दिला होता. यातून चार महिन्यांपूर्वी झालेले काम निकृष्ट झाल्याचे दिसून आले आहे.

सांगली- कोल्हापूर महामार्गावरील अंकली, उदगाव टोल नाका-गावभाग-बायपास बाह्य वळण, जयसिंगपूर शहर, चिपरी फाटा, चौंडेश्वरी चौक, इचलकरंजी फाटा, तमदलगे बसवन खिंड, बायपास मार्ग, निमशिरगाव गाव, हातकणंगले, मजले बाह्य वळण, अतिग्रे (इचलकरंजी व रुकडी फाटा), माले फाटा, हेरले, चोकाक, हालोंडी, शिरोली येथे मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने ही गावे अपघाताची प्रवणक्षेत्रे बनली आहेत. यात अनेकांचे बळी गेले आहेत.

लोकप्रतिनिधी करतात तरी काय?

खासदार धैर्यशील माने, खासदार संजयकाका पाटील, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, हातकणंगलेचे आमदार राजुबाबा आवळे यांच्या मतदारसंघातून हा महामार्ग आहे. होत असलेली अपघाताची मालिका थांबविण्यासाठी पक्ष व राजकीय मतभेद बाजूला ठेवून महामार्गाचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढे येण्याची मागणी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील नागरिकांची आहे.

भूसंपादन तातडीने होण्याची गरज

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गात सांगली-कोल्हापूर महामार्ग विलीन करण्यात आला आहे. सध्या अंकलीपर्यंतचे काम पूर्ण झाले असून उर्वरित उदगाव ते शिरोली या महामार्गावरील भूसंपादन रखडले आहे. खासदार धैर्यशील माने यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा केल्यानंतर रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गातील शिरोली-उदगावपर्यंतच्या मार्गाच्या भूसंपादनास 4 ऑगस्ट 2022 रोजी तत्त्वतः मान्यता मिळाली होती. सध्या महामार्गाची झालेली दुरवस्था व अनेकांचे बळी जात असल्याने तातडीने भूसंपादन होणे गरजेचे आहे.

Back to top button